अज्ञात महिलेविरूद्ध गुन्हाअमरावती: वरूड तालुक्यातील बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातुर्णा येथील आठवडीबाजारस्थित महिलांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात नवजात अर्भक मृतावस्थेत आढळले. २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास ही घटना उघड झाली. शवविच्छेदनानंतर ते नवजात अर्भक स्त्री असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी बेनोडा पोलिसांनी २४ सप्टेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास अज्ञात महिलेविरूध्द गुन्हा दाखल केला.
हातुर्णा ग्रामपंचायतने बांधलेल्या सार्वजनिक महिला शौचालयामध्ये एक नवजात अर्भक मृतावस्थेत असल्याची माहिती तेथील सरपंच शिवाजी ठाकरे यांनी पोलीस पाटील प्रकाश गोहत्रे यांना दिली. त्यावरून गोहत्रे घटनास्थळी पोहोचले. तेथे जाऊन पाहिले तर स्वच्छतागृहाती सिटच्या दोन पायदानाच्या मधात एक नवजात अर्भक मृतावस्थेत दिसून आले. याबाबत त्यांनी तातडीने बेनोडा पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तथा ते मृत अर्भक वरूड ग्रामीण रूग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठविले. पोलीस पाटलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात महिलेविरूद्ध गु्न्हा दाखल केला. ते बाळ अनैतिक संबंधातून जन्माला आले, की मुुलगी नको म्हणून गर्भपात करण्यात आला, या दोन्ही दिशेने पोलिसांनी तपास चालविला आहे.अशी आहे तक्रारत्या नवजात अर्भकाची पुर्ण वाढ झालेली नव्हती. तो गर्भ केवळ चार ते पाच महिन्यांचा होता. पूर्ण वाढ न झालेले ते बाळ गर्भपातानंतर सार्वजनिक महिला शौचालयात टाकून दिले. त्यामुळे नवजात अर्भकाच्या मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लाउन अपत्य जन्म दडविल्याचा गुन्हा एका अज्ञात महिलेविरूध्द नोंदविण्यात आला. या घटनेमुळे छोट्याशा हातुर्णा गावात मोठी खळबळ उडाली. नागरिकांमध्ये त्या घटनेबाबत चर्वितचर्वण देखील झाले.
पोलीस पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात महिलेविरूध्द गुन्हा दाखल केला. पीएम रिपोर्टनंतर ते पुर्ण वाढ न झालेले नवजात अर्भक स्त्री जातीचे असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.मिलिंद सरकटे, ठाणेदार, बेनोडा