अमरावती : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवर शाळेत प्रवेश देण्यासाठीची अंतिम प्रवेश प्रक्रियेची मुदत २३ एप्रिलला संपली. मात्र आता ही प्रक्रिया २९ एप्रिलपर्यंत राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतला आहे.आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी जि.प. शिक्षण विभागाकडे आॅनलाईन अर्ज केले होते. प्राप्त अर्जानुसार पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन लकी ड्रॉ काढण्यात आला होता. त्यानंतर ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून शिक्षण विभागाने प्रवेशितांच्या अंतिम निर्णयासाठी शिक्षण विभागाच्या पुणे कार्यालयाकडे अहवाल पाठविला आहे. आतापर्यंत १२५० पालकांना आपल्या पाल्याच्या शाळा प्रवेशाचे एसएमएस धडकले आहे. सुमारे ४९० अर्ज प्रलंबित आहेत. आरटीईनुसार वंचित तसेच आर्थिक दुर्बल घटकातील पाल्यांसाठी इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. याकरिता पहिल्यांदाच प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, विस्तार अधिकारी किशोर पुरी यांच्या मार्गदर्शनात प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्ह्यातील एकूण ३४६९ अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. त्यापैकी १६०१ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरलेत. ७ एप्रिलला शिक्षण विभागामार्फत लकी ड्रॉ काढण्यात आला. यातील ११११ विद्यार्थ्यांना शाळा देण्यात आला आहेत. पहिल्या टप्प्यातील शाळांमध्ये २३ एप्रिलपर्यत प्रवेश घेणे बंधनकारक केले होते. मात्र या मुदतीत पात्र ठरलेल्या बऱ्याच पालकांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे पालकांनी २९ एप्रिलपर्यंत प्रवेश पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी २९ एप्रिलची 'डेडलाईन'
By admin | Published: April 26, 2015 12:22 AM