व्हिडिओ कॉन्फरन्स : महसूल विभागाला सूचना अमरावती : जिल्ह्यातील संगणीकृत सातबारे व ई-फेरफार नोंदणीचे काम ३१ डिसेंबर २०१६ पूर्वी करावे तसेच सर्व तलाठ्यांना लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडील जिल्हा वार्षिक योजना व नाविण्यपूर्ण योजनेत निधितून आवश्यक तो निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची कारवाई करण्याची सूचना राज्याच्या महसूल विभागाने केली आहे.संगणीकृत सातबारा व ई-फेरफार नोंद तसेच महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाच्या मागण्यांबाबत आढावा घेण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ७ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजय गौतम आदी उपस्थित होते. संगणीकृत सातबारा व ई-फेरफार नोंदीचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी तहसीलदार यांनी ज्या अडचणी असतील त्याची माहिती करून घ्यावी व त्याची तपासणी करून त्या सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. त्या ठिकाणी तलाठ्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. तेथे तातडीने प्रशिक्षण देण्यात यावे. ज्या तलाठ्यांची डेटा कार्डची रक्कम देणे बाकी असेल ती ज्यांनी ‘एडीत मोड्यूल’मधील आवश्यक सुधारणा विषय तज्ञ समितीकडे सादर कराव्यात अशा सूचना महसूल मंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासोबतच तलाठी सांझाच्या पुनर्ररचनेबाबत शासन सकारात्मक असून, त्यावर लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ई-फेरफार नोंदणीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत डेडलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2016 12:21 AM