तळेगाव दशासर : गावातील मुख्य रस्त्यांवरील अनेक नालींवरच्या सिमेंट प्लेट तुटल्याने अनेक ठिकाणी मधोमध खड्डे पडले आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला अनेकदा सूचना देऊनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
नवदुर्गा बँक, मेडिकल चौक, हनुमान मंदिर आदी ठिकाणी रस्त्यांच्या मधोमध खड्डे पडले आहेत. या मुख्य मार्गावरील नालीच्या पुलावरील सिमेंट प्लेट गेल्या काही वर्षांआधी बसविण्यात आल्या होत्या. जड वाहनास प्रवेश निषिद्ध असल्याचे फलक लावलेले असूनसुद्धा ग्रामपंचायतकडून कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली जात नसल्याने ती वाहने गावात शिरतात. परिणामी अनेक नालींवरील सिमेंट प्लेट व रस्त्यावर खड्डे पडतात. सिमेंट प्लेट तुटल्याने यामुळे दुचाकीचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायतने याकडे जातीने लक्ष देऊन नव्याने सिमेंट प्लेट टाकून ये-जा करणाऱ्या लोकांना हे मार्ग सोयीस्कर करून देण्यात यावे, अशी मागणी अनेक भागांतील नागरिक करीत आहेत.