दर्यापूर/परतवाडा - दुर्मीळ समजल्या जाणा-या दुतोंड्या सापाची तस्करी करताना चौघांना दर्यापूरनजीक शनिवारी अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबई वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो, मेळघाट वाइल्ड लाइफ क्राइम सेल व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने केली.
अब्दुल हनिफ अब्दुल हबीब (३६), गौर शाह कादर शाह (४६), अफजल हुसेन अली रियाज अली ऊर्फ चाचा (५९ तिघेही रा. अकोट फैल, अकोला) व तस्लीम शाह तुकमान शाह (३५, रा. चोहोट्टा बाजार, जि. अकोला) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून साडेचार किलो वजनाचा दुतोंड्या साप व तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या सापाची किंमत पाच कोटी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपींनी या सापाचा सौदा अडीच कोटी रुपयांत केला होता.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई येथील वाईल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरोला दुतोंड्या सापाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मेळघाट वाइल्ड लाइफ क्राइम सेलला देण्यात आली. सोबत चार विशेष गुप्तहेर अधिकारी पाठविले होते. सदर कारवाई करताना होणारा संभाव्य धोका किंवा हल्ला पाहता, स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली. या तिन्ही पथकांच्या संयुक्त पथकाने बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर नांदुरा येथे शुक्रवारी रेकी करण्यात आली. बनावट ग्राहक बनून सौदा करण्यात आला. शनिवारी दुपारी १२ वाजता दर्यापूर दहिहांडा रस्त्यावर एकूण सात तस्कर तीन दुचाकी व कारने आले. निश्चित ठिकाणी येताच चौघांना अटक करण्यात आली, तर नासीर शाह बाशीक शाह हा फरार झाला.
दर्यापूर पोलिसांत गुन्हा सदर कारवाई दर्यापूर पोलीस हद्दीत झाल्याने मुंबई, मेळघाट व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दर्यापूर पोलिसांत तक्रार केली. शनिवारी सायंकाळी आरोपींवर वनजीवन कायदा १९७२ नुसार ९/२(१६), ३९/४४, ४८(अ), ५१ नुसार गुन्हे दाखल केले.
गोळीबाराची अफवा तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. मात्र, ती अफवाच असल्याचे नंतर स्पष्ट झाले.
मांडुळ साप प्रकरणात चार आोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली असून, गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.- मुकुंद ठाकरे, ठाणेदार, दर्यापूर