लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तालुक्यातील शिराळा येथील संगीता विजय आखरे (२८, रा. शिराळा) यांचा शनिवारी सकाळी कुलरचा जबर शॉक लागल्याने मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ नेले होते. मात्र वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने त्यांना ऐनवेळी अमरावती येथे हलवावे लागले. परिणामी वेळेत उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त ग्रामस्थ व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून संबंधित डॉक्टरांच्या निलंबनाची मागणी रेटून धरली. त्यामुळे शनिवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी अंकुश नवले यांची सेवा समाप्त केली. तसेच वैद्यकीय अधिकारी पद्मलता मुंद्रे यांची एक वेतनवाढ रोखण्याचा निर्णय दिला.भाजपाच्या महिला पदाधिकारी असणाºया संगीता यांना शॉक लागल्यानंतर अत्यवस्थ स्थितीत शिराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तथापि, तेथे वैद्यकीय अधिकारी आणि अन्य कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वाहनाने त्यांना अमरावती येथे हलविण्यात आले. मात्र, वाटेचत त्यांचा मृत्यू झाला. संगीता आखरेंच्या मृत्यूमुळे ग्रामस्थ व भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला. शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घरातील फरशी पुसल्यानंतर संगीता आखरे यांनी कुलर सुरू केला. त्याचवेळी त्यांना वीज प्रवाहाचा जबर धक्का बसल्याने त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना तातडीने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी, परीचारिका वा अन्य कुठलाही कर्मचारी तेथे नव्हता. आरोग्य यंत्रणेशी सपर्क साधल्यानंतर एका रुग्णवाहिकेने आखरे यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तथापि त्यांचा उपचाराअभावी काही वेळातच मृत्यू झाला. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. दरम्यान वैद्यकीय अधिकाºयांच्या अनुपस्थितीमुळे संगीता यांच्यावर तातडीने उपचार होऊ शकला नाही. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप करीत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस जयंत आमले यांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात आला. शिराळा येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे समजताच तालुका वैद्यकीय अधिकाºयांनी शिराळा गाठून संबंधितांविरुद्ध कारवाईचे आश्वासन दिले.यशोमती ठाकूर अधिकाऱ्यावर संतापल्याडॉक्टर उपस्थित नसल्यामुळे संगीता आखरेंचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या आमदार यशोमती ठाकूर यांनी शवविच्छेदनगृह गाठले. आखरे कुटुंबीयांचे सांत्वन केले. उपचारात दिरंगाई झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याची ही पहिली घटना नसून, यापूर्वीही अनेक बळी गेले आहेत. तुम्ही डॉक्टर मंडळी नेमके करता तरी काय, असा सवाल आ. ठाकूर यांनी आरोग्य यंत्रणेला केला. दोषी आरोग्य यंत्रणेला धारेवर धरून त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना खडसावत जाब विचारला. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, गरज पडल्यास फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी रेटून धरली.माजी पालकमंत्री रुग्णालयातभाजपा पदाधिकारी असलेल्या संगीता आखरे यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे कळताच माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, जयंत आमले हेसुद्धा त्यावेळी उपस्थित होते. प्रवीण पोटे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्याशी संवाद साधून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.मृतदेह उचलण्यास नकारप्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व संबंधित दोषींना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी रेटून धरण्यात आली होती. आखरे कुटुंबाने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. आ. यशोमती ठाकूर, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाशी संपर्क साधून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची सूचना केली. संबंधितांच्या निलंबनाचे आश्वासन मिळाल्यानंतर संगीता आखरे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी ४ वाजताच्या सुमारास संगीता आखरेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉ.अंकुश नवले यांची सेवा समाप्तीचे आदेश काढण्यात आले, तर वैद्यकीय अधिकारी पद्मलता मुंद्रे यांची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे.- मनीषा खत्री,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
कुलरमधील विजेच्या धक्क्याने भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 1:01 AM
तालुक्यातील शिराळा येथील संगीता विजय आखरे (२८, रा. शिराळा) यांचा शनिवारी सकाळी कुलरचा जबर शॉक लागल्याने मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ नेले होते. मात्र वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने त्यांना ऐनवेळी अमरावती येथे हलवावे लागले.
ठळक मुद्देग्रामस्थांनी ठोकले शिराळा पीएचसीला कुलूप। सीईओंनी रोखली वैद्यकीय अधिकाऱ्याची वेतनवाढ