अमरावती : मध्यवर्ती बसस्थानकासमोर धोकादायक आणि जीवघेण्या पद्धतीने फिरणारे आॅटोरिक्षा जणू मृत्यूचे फिरते पिंजरेच ठरले आहेत. आॅटोरिक्षांच्या बेबंदशाहीमुळे खासगी कार, एसटी बसेस, दुचाकी आदी वाहनेही अपघात घडवून आणणाऱ्या स्थितीत चालविली जातात वा पार्क केली जातात. विशेष असे की, वाहतूक पोलिसांच्या संरक्षणात वाहतूक नियमांची लक्तरे वेशीवर टांगली जातात. शहरातील वाहतूक सुधारण्याचा संकल्प सोडणारे पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी दिलेले आदेश सुरुवातीला काही प्रमाणात पाळले गेले; तथापि आता त्यांच्या अधिनस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच आयुक्तांच्या आदेशाला खो दिला. बेशिस्त, जीवघेण्या वाहतुकीला बळ दिल्याने मंडलिक वाहतूक सुधारणेत अपयशी ठरल्याचे स्पष्ट चित्र मध्यवर्ती बसस्थानकासमोर दिसून येत आहे. दररोज ये-जा करणाऱ्या बसगाड्या व प्रवासी वाहतूक करणाऱ्या आॅटो चालकांच्या गर्दीमुळे बसस्थानक परिसरात व मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. दर पाच मिनिटांना बसस्थानकात एक एसटी प्रवेश करते. बसगाड्यांची आवागमनाची व्यस्तता इतकी अधिक असताना वाहतूक सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्याची पोलिसांची जबाबदारी अधिकच वाढते. मात्र त्याच मुद्याचा अभाव या परिसरात आढळतो. बसस्थानकात प्रवेश करण्याकरिता एसटी चालकाला वाहतूक अडथळ्याचा सामना करावा लागत आहे. पोलीस प्रशासनाने आॅटोचालकांना एक रांगेत आॅटो उभे करून प्रवासी घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, तरीसुध्दा बहुतांश आॅटो अस्तव्यस्त स्थितीत बसस्थानकासमोरील रस्त्यावर उभे असतात. हा रस्ता जणू खुले मैदान असावे, अशा पद्धतीने तेथे आॅटोरिक्षा गोलगोल फिरविल्या जातात. बसस्थानकातून प्रवासी बाहेर येताच आॅटो चालक प्रवाशांवर तुटूनच पडतात. नियम, शिस्त, नागरिकांचे हक्क, शहराचे स्वास्थ्य जणू अमरावतीत अस्तित्वात नाहीच, असेच तेथे सारे चित्र असते. सामान्यजणांना सहज दिसणारे, पित्त खवळावणारे हे जीवघेणे चित्र तेथे तैनात असणाऱ्या वाहतूक पोलिसांना मात्र दिसत नाही. वाहतूक पोलीस तेथे तैनात असण्याचे कारण काय? राजरोसपणे वाहतूक नियम पायदळी तुडविले जात असताना ते रोखणे पोलिसांचे कर्तव्य नाही काय? वाहतूक पोलीस वेतन घेतात ते कशासाठी? तैनात कर्मचाऱ्यांना वाहतूक नियंत्रण करायचेच नसेल तर पोलीस आयुक्त त्यांची नेमणूक त्या ठिकाणी करतात तरी कशासाठी? हजारो लोकांदेखत कर्तव्य नाकारण्याचे धैर्य कुण्या वर्दीधारी कर्मचाऱ्याचे होते तरी कसे? आयुक्तांचा वचक संपला की या प्रकाराला त्यांचे बळ आहे? (प्रतिनिधी)अवैध प्रवासी वाहतुकीलाही जोर४खासगी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स बसस्थानकाजवळ उभ्या राहून प्रवासी घेतात. ट्रॅव्हल्समधील कर्मचारी बसस्थानकाच्या आवारात फिरून प्रवासी गोळा करतात, असा सर्रास प्रकार बसस्थानक परिसरात सुरू आहे. त्यातच मध्यप्रदेशातील ट्रॅव्हल्समधूनसुध्दा अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. मात्र, आजपर्यंत या खासगी वाहतुकीवर अंकुश बसविण्यात पोलिसांना यश आले नाही. बसस्थानकात अवैध पार्किंग४बसस्थानक परिसरातील विविध ठिकाणी अवैध पार्किंग होत असल्याचे अनेकदा आढळून येते. प्रवाशांना बसस्थानकात सोडण्यासाठी येणारे नातेवाईक अथवा मित्र मंडळी त्यांच्या गाड्या बसस्थानकाच्या आवारातच ठेवतात. सारेच कसे आलबेल आहे.
बसस्थानकासमोर मृत्यूचे पिंजरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2016 1:30 AM