पोलीस सूत्रांनुसार, सोनू ऊर्फ अहफाज खान रहमत खान (२७, रा. गुलिस्तानगर, अमरावती) असे मृत मजुराचे नाव आहे. तो बांधकाम स्थळावर उंचावरून कोसळल्याची माहिती राजापेठ पोलिसांना ७ मे रोजी प्राप्त झाली होती. त्यांनी सायंकाळी उशिरा पाहणी केली असता, अशी कुठलीही घटना घडल्याची माहिती मिळाली नाही तसेच इर्विन वा कुठल्याही रुग्णालयातून माहिती प्राप्त झाली नाही. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक मनोज उसरेटे यांनी ९ मे रोजी बांधकाम पर्यवेक्षक नीलेश भोगरे (रा. धन्वंतरीनगर, बांधकाम ठेकेदार मोहम्मद शहजान अब्दुल रहमान (रा. गुलिस्तानगर) व मृताचा धाकटा भाऊ अजर खान (२६) यांचे बयाण घेतले. त्यानुसार, बांधकाम मिस्त्री असलेला सोनू हा ७ मे रोजी सकाळी ११ वाजता इमारतीच्या सहाव्या माळ्यावर छपाई करीत असताना चैलीवरून पाय घसरून खाली कोसळला. त्याला मजूर व नागरिकांनी दोन खासगी दवाखान्यांनंतर इर्विनमध्ये आणले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. येथून शवविच्छेदन न करताच त्याचा मृतदेह अंत्यविधीकरिता नेण्यात आला. ४० फूट उंचावरून कोसळल्याने बरगड्या व मेंदूला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालावरून पोलिसांनी नमूद केले. याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात सोमवारी मर्ग दाखल करण्यात आला.
शंकरनगर येथे बांधकाम मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:13 AM