अमरावती: राजापेठ पोलीस ठाण्यातील हवालातीत आरोपी सागर ठाकरे (२४) याने १९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ च्या सुमारास आत्महत्या केली. घटनेनंतर लगेचच तपासाची सुत्रे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने हातात घेतली. दरम्यान, राजापेठ पोलीस ठाण्यातील सिसीटिव्ही फुटेज गुरूवारीच ताब्यात घेण्यात आले. तर, शुक्रवारी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात पोहोचून सीआयडीच्या उपअधीक्षक दिप्ती ब्राम्हणे यांनी तेथील सिसीटिव्ही फुटेजची मागणी केली. तथा बयाण नोंदविण्याची प्रक्रियेला सुरूवात केली होती.
राजापेठ पोलीस ठाण्यातील हवालातीत सिसीटिव्ही कॅमेरा आहे. त्यामुळे घटनेनंतर लगेचच सिआयडीने हवालातमध्ये असलेल्या कॅमेर्याचे फूटेज राजापेठ पोलिसांकडून घेतले. सोबतच केसपेपर, कोठडी रजिस्टर, अनुशंगिक दस्तावेज ताब्यात घेण्यात आला. सागरने नेमकी आत्महत्या केव्हा केली. तो एकुणच घटनाक्रम सिसीटिव्हीमध्ये बंदिस्त आहे, त्या दिशेने सिआयडीने तपासाला गती दिली आहे.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी सिआयडीच्या उपधीक्षक ब्राम्हणे या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात पोहोचल्या. १७ ऑगस्ट रोजी दुपारी सागर ठाकरे हा फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात आला, तिथपासून त्याला राजापेठ पोलीस ठाण्यात नेईपर्यंतच्या सिसीटिव्ही फुटेजची मागणी करण्यात आली. तथा प्रकरणाशी संबंधित फ्रेजरपुरा व राजापेठ ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचे बयान नोंदविले जाणार असल्याची माहिती सिआयडीकडून देण्यात आली. फ्रेजरपुरा पोलिसांत नोंद एफआयआरची साक्षांकित प्रत देखील घेतली जाणार आहे.
अकोल्यात शवविच्छेदन
गुरूवारी सायंकाळच्या सुमारास सागर ठाकरेच्या मृतदेहाची उत्तरिय तपासणी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली. त्यानंतर त्याचे पार्थिव कुटुंबियांकडे सुपुर्द करण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील खंबित या मुळगावी पोलीस बंदोबस्तात सागरच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्या सर्वांची चौकशी?
घटनेवेळी दहा पोलीस कर्मचारी ठाण्यात उपस्थित असताना पोलीस कोठडीत आरोपी आत्महत्या करतो. वेळही सकाळची. त्या परिस्थितीत कोण कर्मचारी नेमके कुठे होता, गार्ड होता, की झोपी गेला होता, हेही सिसीटिव्ही फुटेजमधून उलगडणार आहे. शर्ट बांधून, आत्महत्या करेपर्यंत प्रवेशद्वाराकडे कुणी कसे फिरकले नाही, ही बाब देखील तुर्तास अनुत्तरित आहे.
कोट
राजापेठ ठाण्यातील पोलीस कोठडीत झालेल्या आरोपीच्या आत्महत्या प्रकरणाचे संपुर्ण सिसीटिव्ही फुटेज उपलब्ध आहेत. त्या आधारे चौकशीला वेग दिला आहे. बयान नोंदविले जात आहेत.
अमोघ गावकर,
अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषन विभाग
अमरावती