अमरावती : डिबीवरुन कृषी पंपाचा वीज प्रवाह सुरु करण्यास गेलेल्या युवा शेतकऱ्याचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ९.१० वाजताच्या सुमारास भिलापूर शेतशिवारात घडली. अमोल ज्ञानेश्वर पाथरे (२६, रा. भिलापूर, शिरखेड) असे मृताचे नाव आहे.भिलापूर गावातील कृषिपंपाना होणारा विद्युत पुरवठा रोज खंडित होत असल्यामुळे गावकरी त्रस्त आहेत. वीज जोडणी अधिक असल्यामुळे रोज वीज पुरवठा खंडित होतो. विद्युत पुरवठा सुरळीत होण्याबाबत गावकऱ्यांनी अनेकदा वीज कंपनीला साकडे घातले. मात्र अधिकारी कायम दुर्लक्ष करीत आलेत. पिके जगविण्यासाठी शेतकरी डिबीतील फेज टाकण्याचे कार्य स्व:तच करतात. सोमवारी सकाळी ९.१० वाजताच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाला. कृषीपंप सुरू करण्यासाठी अमोल पाथरे फेस टाकण्यास गेला. शॉक लागला. गावकऱ्यांनी अमोलला इर्विन रुग्णालयात आणले. मात्र सकाळी ११ च्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. नाहक बळी गेलेल्या अमोलचा मृतदेह इर्विनमध्ये शवविच्छेदनासाठी ताटकळत ठेवण्यात आला. मृतदेहाची अवहेलना होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप होता. आमदार यशोमती ठाकूर इर्विनमध्ये पोहोचल्या. त्यांनी प्रशासनाला धारेवर धल्यावर पीएम करण्यात आले. (प्रतिनिधी)
वीज कंपनीच्या हलगर्जीपणाने शेतकऱ्याचा मृत्यू
By admin | Published: December 01, 2014 10:45 PM