अमरावती : बाळाचा मृतदेह आणण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने आदिवासी कुटुंबाला बसने नागपूरहूनअमरावती गाठावे लागले. या घटनेने मेळघाटवासीयांच्या भळभळत्या जखमेवरील खपली निघाली असून, त्यांच्या मरणयातना केव्हा संपणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
चिखलदरा तालुक्यातील धरमडोह येथील किशोर कासदेकर यांनी आपल्या ४२ दिवसांच्या बाळाला २३ नोव्हेंबरला रात्री दोनच्या सुमारास टेंब्रुसोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तेथून बाळाला अचलपूर व पुढे दुसऱ्या सकाळी ११ च्या सुमारास नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.
रुग्णवाहिका मिळाली नाही; अखेर पित्याने बसमधूनच नेला चिमुकल्याचा मृतदेह
ते कमी वजनाचे बाळ व्हेंटिलेटरवर होते. तब्बल १८ दिवसांच्या उपचाराअंती ८ डिसेंबरला ते बाळ दगावले. मृत बाळाला गावी घेऊन जाण्यासाठी किशोर कासदेकर यांनी नागपुरात रुग्णवाहिका मिळविण्याचा प्रयत्न केला; परंतु ती मिळाली नसल्याने त्यांना एसटी बसने अमरावतीस यावे लागले. १०८ रुग्णवाहिकेतून बाळाला गावी पोहोचवता आले असते; परंतु, १०८ रुग्णवाहिका मृतांसाठी जात नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
नागपूरहूनच रुग्णवाहिका मिळाली नसती का?
दगावलेले बाळ आणण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने टेंब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेची व्यवस्था केली होती. ही रुग्णवाहिका अमरावतीला पोहोचून येथून बाळाला रुग्णवाहिकेने गावी नेण्यात आले. परंतु, नागपूरहूनच आरोग्य विभागाला रुग्णवाहिकेची व्यवस्था करता आली नसती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मेळघाट सेलचा उपयोग काय?
मेळघाटातील आदिवासी रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय व नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेळघाट सेल स्थापन करण्यात आला आहे. त्या माध्यमातूनच आदिवासी रुग्णांना मदत केली जाते. त्यामुळे बाळाच्या मृत्यूनंतर बाळाला अमरावती आणण्यासाठी मेळघाट सेलने कुठली उपाययोजना केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बाळ दगवल्यासंदर्भात संबधित बाळाच्या कुटुंबाकडून माहिती मिळाली नाही. सामाजिक कार्यकर्त्यांकडून माहिती मिळाल्यानंतर टेंब्रुसोडा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देत रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. परंतु, बाळाचे वडील हे नागपूरहून बसने निघाल्याची माहिती मिळाल्याने त्यांना अमरावती येथून रुग्णवाहिकेने गावी पोहोचविण्यात आले.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्याधिकारी
या प्रकरणासंदर्भात संबधित आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेच्या सीईओंशी चर्चा करून माहिती घेते.
- पवनीत कौर, जिल्हाधिकारी, अमरावती