चिखलदरा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित असलेल्या कोहा जंगलातील एका तलावात सात वर्षे वयाच्या टी- ३२ वाघाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी पाण्यात आढळले. या घटनेने व्याघ्रप्रकल्पात एकच खळबळ उडाली. गुरुवारी सकाळी वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले.मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागातील कोहा या पुनर्वसित गावातील अतिसंरक्षित परिसरातील एका छोटेखानी तलावात टी-३२ क्रमांकाचा सात वर्षे वयाचा नर वाघ पाण्यात मृतावस्थेत आढळून आला. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, ते संशोधन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार, वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मण आवारे आदी अधिकारी-कर्मचारी व डॉक्टरांचे पथक जंगलात गेल्यामुळे या वाघाच्या मृत्यूसंदर्भात अधिक माहिती मिळू शकली नाही. विष प्रयोगाने मृत्यूची शक्यता?कोहा हा परिसर आता मनुष्यविरहित आहे. पाण्यात बुडालेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आला. वाघ पाण्यात बुडून त्याचा मृत्यू होऊ शकत नाही, हे सत्य असले तरी विषप्रयोगाने वाघाची शिकार करण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही विषारी पदार्थ खाल्ल्यानंतर वाघ पाणी पिण्यासाठी त्या परिसरात गेला व त्यात त्याचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मेळघाटातील तलावात वाघाचा मृत्यू, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी जंगलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 8:47 PM