लोकमत रियालिटी चेक
पान ३ चे लिड
नरेंद्र जावरे
परतवाडा : लगतच्या देवमाळी ग्रामपंचायतस्थित वादग्रस्त ठरलेल्या भामकर हॉस्पिटलमधील डेडिकेटेड कोविड उपचार केंद्रात १९ नव्हे तर तब्बल २७ बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हॉस्पिटल प्रशासनाने पूर्वी दिलेला आकडा खोटा ठरला असून मृतांच्या आकड्याची लपवाछपवी केली जात असल्याची बाबही उघड झाली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाच्या वतीने देवमाळी स्थित भामकर हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. शहरातील डॉ. अरविंद भामकर, डॉ. आशिष भंसाली, डॉ. हेमंत चिमोटे, व डॉ. मंगेश भगत चार डॉक्टरांनी सहाशेच्यावर कोरोना बाधित रुग्णांवर तीन महिने उपचार केले. यादरम्यान नियमांची पायमल्ली करण्यात आली. रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बील वसूल करण्यात आले. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्याची गंभीर दखल घेऊन चौकशी समिती सुद्धा नेमली आहे.
बॉक्स
मृत्यूचा आकड्यात तफावत का?
भामकर हॉस्पिटल अचलपूर तालुक्यातील येसुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येते. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण व उपचार घेताना त्यासंदर्भात सविस्तर माहिती आरोग्य केंद्राला देणे गरजेचे होते. मात्र तीन महिन्यात ती दिली गेली नाही. आरोग्य पर्यवेक्षक अरविंद पिहुलकर यांनी पत्रव्यवहार करूनही भामकर हॉस्पिटलने काहीच प्रतिसाद दिला नाही. मृत्यूचा आकडा किती याची माहिती संदर्भात कारवाईची भाषा बोलल्यावर कार्यरत डॉ. हेमंत चिमोटे यांनी १९ मृत्यू झाल्याचे कळविले. तसे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. मात्र प्रत्यक्षात चौकशी केली असता मृतांचा आकडा अधिक असल्याचे पुढे आले आहे. मृत्यूच्या आकड्यांत लपवाछपवी का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बॉक्स
देवमाळी ग्रामपंचायतमध्ये २७ ची माहिती
भामकर डेडिकेडेट कोविड सेंटरमध्ये तीन महिन्यात २७ रुग्णांचा मृत्यू झाला. पैकी २४ मृतांचे नोंदणीसाठी आवश्यक असलेले नमुना चार प्रपत्रक देवमाळी ग्रामपंचायतला पाठविण्यात आले. तीन मृतांचे प्रपत्र पाठवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. ती माहिती अचलपूर पंचायत समितीला पाठविल्या जाणार आहे. तर काही ऑनलाइन नोंदी करण्यात आल्या असल्याचे ग्रामपंचायती कर्मचारी राहुल सरोदे यांनी सांगितले.
कोट
देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भामकर डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये एकूण २७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. प्रत्यक्षात २४ जणांचे नमुना चार पाठविले असून, उर्वरित तीन मृतांच्या नोंदणीसाठी कागदपत्र यायची आहेत.
- महादेव कासदेकर,
विस्तार अधिकारी (पंचायत)
अचलपूर पंचायत समिती