स्मशानशांतता : आदिवासी पाड्यांमध्ये कोरोना डंख
श्यामकांत पाण्डेय
धारणी : शुक्रवारपासून आजपर्यंत विविध गावांतर्गत जवळपास शंभर व्यक्तींचा मृत्यू झाल्याने धारणी तालुका हादरला आहे . मृत्यूचे कारण समोर येत नसल्याने आणि प्रसंगी सत्यता लपविण्यात येत असल्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मेळघाटातील गावखेड्यात कोरोनाने भयंकर रूप धारण केल्याचे मात्र समोर येत आहे.
धारणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या सर्दी, खोकला आणि तापाने थैमान घातले असून, अनेकांना कोरोनाने ग्रासले आहे. परंतु, उपचार घेण्यासाठी खेड्यातील नागरिक दवाखान्याऐवजी भूमका आणि परिहाराच्या दावणीला बांधले जात असल्याचे भीषण चित्र पाहावयास मिळत आहे. तालुक्यातील सर्वांत जास्त थैमान असलेल्या गावांमध्ये धारणी तालुक्यातील चाकर्दा आणि चिखलदरा तालुक्यातील चिखली या दोन गावांमध्ये अनेक घरांमध्ये आजारी व्यक्तींची संख्या चिंताजनक असल्याची माहिती आहे. चाकर्दा आणि चिखली ही दोन गावे मेळघाटातील मोठे ‘हॉट स्पॉट’ ठरणार असल्याचे चित्र आहे.
चाकर्दा येथे प्राथमिक उपकेंद्र असून, तेथे उपचार करण्यासाठी डॉक्टर नसल्याने एका नर्स आणि औषधविक्रेत्यांच्या भरवशावर उपकेंद्र सुरू असल्याने आजारी व्यक्तींचे योग्य निदान होत नाही,. परिणामी अनेकांनी भूमका, परिहार यांच्याकडे धाव घेतली आहे.
धागेदोरे बांधून घेण्यात व्यस्त
पूर्वीच अंधश्रद्धेच्या गर्तेत असलेल्या मेळघाटातील जनता कोरोनाच्या निदानासाठीसुद्धा भूमका व परिहारकडे धागेदोरे बांधण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे. घरातील लहान बालके सोडल्यास जवळपास अनेक वयस्क महिला, पुरुष तापाने फणफणत असल्याचे चित्र या दोन गावांत पाहावयास मिळत आहे. या दोन गावांव्यतिरिक्त तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ज्यामध्ये कळमखार, बिजुधावडी, बैरागड, सादराबाडी, धूळघाट रेल्वे यांसह धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत गेल्या पंधरवड्यात मोठी वाढ झाली आहे.
खासगी डाॅक्टरांची दमछाक
खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांची उपचार करतांना दमछाक उडत आहे. एकीकडे डॉक्टरी पेशा म्हणून सेवा करायची की कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करायचे, असा भीषण सवाल या डॉक्टरांसमोर निर्माण झाले आहे. तरीसुद्धा सेवाभावाने रुग्णांचा उपचार सुरू असल्याचे अनेक डॉक्टरांनी खासगीत सांगितले.
एका आठवड्यात शंभर यमसदनी
तालुक्यातील विविध गावांत दररोज मृत्यूची मालिका सुरू आहे. धारणी शहरात मयतीसाठी सामग्री विक्री करणारे किराणा दुकानदार दिनेश भुराराम पांड्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे गेल्या आठवड्यात शंभरावर मृतदेहांकरिता सामग्रीची उचल झाली आहे. अवघ्या पाच दिवसांत दररोज १५ ते १८ व्यक्तींकडून ही सामग्री उचलण्यात आले. त्यामुळे माझेच हात-पाय कापत होते, अशी माहिती दिनेश पंड्या यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कोट
कोरोनापासून स्वतःचे प्राण वाचविण्याची आवश्यकता आहे. सर्वांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. आवश्यकता असल्यासच घराबाहेर मास्क घालून व सामाजिक अंतर ठेवून व्यवहार करावा. तालुक्यातील मृत्युसंख्या चिंताजनक आहे.
मिताली सेठी, सहायक जिल्हाधिकारी