लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नवसारीस्थित महर्षी पब्लिक स्कूलमध्ये एका आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ३.३० वाजतादरम्यान घडली. रोशन कैलास सावलकर (८, रा. नागझिरा ता.धारणी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. शाळा संचालकांच्या हलगर्जीपणामुळे रोशनला वेळीच वैद्यकीय उपचार न मिळाल्याचा आरोप पालकांसह विद्यार्थी संघटनांनी केला. यासंदर्भात जाब विचारण्यासाठी अपर आयुक्तांच्या दालनात ठिय्या देण्यात आला.आदिवासी विकास विभागाच्या अख्त्यारित नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यानुसार महर्षी पब्लिक स्कूलमध्ये आदिवासी विद्यार्थी प्रवेशित आहेत. गत तीन दिवसांपासून रोशन सावलकर याची प्रकृती गंभीर होती. परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तो केवळ दूध, बिस्किट घेत होता. त्याचे जेवण बंद झाले होते. मात्र, त्याच्याकडे लक्ष देण्यात आले नाही. प्रकृती अधिक खालावल्यानंतर सोमवारी उशिरा रात्री शाळा व्यवस्थापनाने रोशन याला जिल्हा सामान्य रूग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी हलविले, अशी तक्रार मृत रोशनचे वडील कैलास सावलकर यांनी गाडगेनगर पोलिसांत नोंदविली आहे.रोशन याला प्रथमत: महर्षी पब्लिक स्कूलमध्ये पहिल्या वर्गात प्रवेश दिला होता. यंदा तो दुसरीत होता. पालकांचे एकुलते एक अपत्य असल्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही सर्व कैफियत त्याच्या आई-वडिलांनी अपर आयुक्त गिरीश सरोदे यांच्या पुढ्यात मांडली. रोशनची प्रकृती खालावल्यानंतर त्याला वैद्यकीय उपचारासाठी न पाठविता बराचवेळ वसतिगृह परिसरात ठेवण्यात आले.
तो शाळेतच दगावला असताना हे प्रकरण अंगलट येऊ नये, या कारणास्तव त्याला इर्विनमध्ये दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी सोमवारी त्याला मृत घोषित केले. हे प्रकरण संशयास्पद असल्याने सखोल चौकशी व्हावी, शवविच्छेदनासाठी समिती गठित करावी. शाळा संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार एटीसी गिरीश सरोदे आणि पोलिसात करण्यात आली आहे. यावेळी कैलास सावलकर, मंगराय सावलकर, मुन्ना दारसिंबे, बलराम सावलकर, मंगेश बेठेकर, हिराचंद कास्देकर, पंकज व्हेराटे, रामेश्वर युवनाते आदींनी शाळांच्या गलथान कारभारावर ताशेरे ओढले.चौकशी समितीच्या नियंत्रणात शवविच्छेदनआदिवासी विद्यार्थी रोशन सावलकर याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आक्षेप घेत पालकांसह आदिवासी विद्यार्थी संघटनांनी शवविच्छेदनासाठी चौकशी समिती गठित करावी, अशी मागणी एटीसीकडे केली. त्यानुसार एटीसी गिरीश सरोदे यांनी तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी व आदिवासी विकास विभागाच्या अधिकाºयांचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय समितीचे गठन केले. या समितीकडे रोशनच्या शवविच्छेदनासह ‘महर्षी’मध्ये वैद्यकीय उपचार, आरोग्य तपासणी, पायाभूत सुविधांची चाचपणी करण्याची जबाबदारी सोपविली. या समितीच्या नियंत्रणात सोमवारी उशिरा मृत रोशनचे शवविच्छेदन करण्यात आले.इर्विनमध्ये उपचारादरम्यान रोशनचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. धारणी प्रकल्प अधिकाºयांच्या नियंत्रणात त्रिसदस्यीय समिती गठित झाली आहे. ही समिती शाळा व शवविच्छेदनाबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. २४ तासांच्या आत अहवाल प्राप्त होताच दोषींवर कारवाई निश्चित होईल.-गिरीश सरोदे, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग अमरावती