अमरावती : तप्त उन्हात वणवण भटकंती करणाऱ्या एका अनोळखी इसमाचा उष्माघाताने मृत्यू झाला. ४५ ते ५० वयोगटातील त्या अनोळखीचा मृतदेह मंगळवारी सकाळी शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील एका झाडासाठी केलेल्या आळ्यात आढळून आला. भूक व उन्हाच्या तडाख्याने त्या इसमाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेच्या माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उचलून इर्विन रुग्णालयाच्या शवगृहात पाठविला. अनोळखी इसमाच्या अंगावर शर्ट नव्हता; पॅन्ट घातलेला होता. मृताची उंची ५ फूट ६ इंच असून, रंग गोरा आहे. अद्याप मृताची ओळख पटली नसून, पोलीस नातेवाइकांचा शोध घेत आहेत. या अनोळख्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी गाडगेनगर ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
बचावासाठी अशी घ्या काळजीजलसंजीवनीचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावे. सौम्य रंगाचे सैल आणि सुती कपडे परिधान करावे. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट वापरावे. घर थंड ठेवावे. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. ओआरएस, घरची लस्सी, लिंबू पाणी, ताक नियमित घ्यावे. थंड पाण्याने आंघोळ करावी. अशक्तपणा, कमजोरी वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी घ्याव्यात. उन्हात जाण्यापूर्वी सनक्रिमचा वापर करावा. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत उन्हात फिरू नये. मद्यसेवन, चहा, कॉफी, कार्बोनेटेड कोल्ड घेऊ नये. उच्च प्रथिनयुक्त आहार, शिळे अन्न खाऊ नये. मुलांना काचबंद वाहनांत ठेवू नये. उष्णता शोषून घेणारे कपडे त्यांच्या अगात घालण्याकरिता वापरू नये अशाप्रकारे उष्माघातापासून बचावासाठी काळजी घेऊन आरोग्याची निगा राखण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेने केले आहे.