चिखलदरा (अमरावती) : कोरोना तपासणीत पॉझिटिव्ह निघालेली ४५ वर्षीय महिला दवाखान्यातील औषधे सोडून उपचारासाठी नजीकच्या गावातील भूमकाकडे गेली. गुरुवारी सायंकाळी प्रकृती खालावल्याने तिचा मृत्यू झाला. मृतदेह सेमाडोह गावी आणण्यात आला. पॉझिटिव्ह असल्याने प्रशासनाने रात्री अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, नातेवाइकांनी नकार दिला. शुक्रवारी दुपारी २ वाजता तब्बल २० तासांनंतर महिलेवर नातेवाइकांनी अखेर अंत्यसंस्कार केले. या घटनेने मेळघाटात खळबळ उडाली आहे
मेळघाटातील आदिवासी सर्दी, खोकला, ताप ते प्रत्येक आजार आणि शुभकार्यासाठी भूमका (मांत्रिक) कडे उपचारासाठी जातात. लहान मुलांच्या अंगावर डम्मा (गरम विळ्याचे चटके) देण्यासह विविध अघोरी पद्धत अवलंबविली जात असल्याचे ‘लोकमत’ने अनेकदा प्रकाशित केले. सुत्रांनुसार, सेमाडोह येथील ४५ वर्षीय विधवा महिलेची तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल १२ एप्रिल रोजी १०.५० वाजता डॉक्टरांनी दिला. त्यानुसार सदर महिलेला होमक्वारंटाईन करण्यात आले.
भूमकाकडे ठोकली धूमतपासणी अहवालात पॉझिटिव्ह असला तरी आपणास काहीच झालेले नाही, असे तिने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या यंत्रणेला सुनावून तिने उपचारासाठी सेमाडोहपासून दहा किमी अंतरावरील भवई गाव गाठले. तेथे नातेवाईकांकडे जाऊन कोरोना व तिला असलेल्या आजारावर भूमकाकडे उपचार सुरू केला. या दरम्यान आजार बळावल्याने गुरुवारी तिचा मृत्यू झाला
रात्रभर मृतदेह पडूनमहिलेचा मृतदेह गुरुवारी रात्री ८ वाजता सेमाडोह येथील घरी आणण्यात आला. गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉ. महेश कूर्तकोटी, जिल्हा परिषद सदस्य सुनंदा काकड, सरपंच अनिता चिमोटे, ग्रामसेवक सुरेंद्र चिकटे यांना पाचारण केले. अंत्यसंस्कार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा पीईपी किट व साहित्य घेऊन तयार होती. सर्वांनी समजाविले तरी नातेवाईक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांच्या हट्टामुळे कोरोना पॉझिटिव्ह असलेला मृतदेह रात्रभर घरीच ठेवण्यात आला. अखेर शुक्रवारी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
सेमाडोह येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू शुक्रवारी भवई गावात झाला. उपचारासाठी ती मांत्रिकाकडे गेली होती. अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइकांनी गुरुवारी रात्री प्रचंड विरोध दर्शविला.
- माया माने, तहसीलदार, चिखलदरा
पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पीईपी किट घेऊन आरोग्य कर्मचारी स्थानिक प्रतिनिधी गुरुवारी रात्रभर त्यांच्या नातेवाइकांना समजून घातली. मात्र, त्यांनी कुणाचेच ऐकले नाही. महिलादेखील औषध उपचार सुरू असताना भूमकाकडे उपचारासाठी गेली व तेथे तिचा मृत्यू झाला.
- सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा