मृत्यूपूर्वी लिहिली चिठ्ठी : खानापूर येथील घटना वरूड : तालुक्यातील खानापूर येथे कर्जापायी एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यांच्यावर बँका, सेवा सहकारी संस्था आणि खासगी फायनान्स कंपन्यांचे कर्ज असल्याची चर्चा आहे. शिवहरी वामनराव ढोक (४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शिवहरी ढोक यांच्यावर सहकारी सोसायटी, सहकारी बँक आणि एका फायनान्स कंपनीचे कर्ज होते. सततची नापिकी आणि निसर्गाची अवकृपा यामुळे कपाशीचे पीक बुडाले. चहुबाजुंनी संकट आल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले होते. अशा परिस्थितीत संसाराचे रहाटगाडगे कसे चालवावे, हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. अशात सहकारी संस्था, बँकांकडूून घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. फायनान्स कंपनीचे अधिकारी कर्ज वसुलीसाठी तगादा लावत असल्याने नैराश्य आल्याने त्यांनी आत्महत्या केली. फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी कर्जवसुुलीसाठी सतत धमक्या देत असल्याने ते त्रस्त होते, असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यांच्या पश्चात तीन मुली, पत्नी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. शिवहरी ढोक यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये बँक, सहकारी संस्था तसेच सावकार आणि खासगी फायनान्स कंपनीच्या तगाद्यामुळे होणाऱ्या त्रासाचा उल्लेख आहे. त्यामुळे बँकांच्या तगाद्याला कंटाळून आणखी किती शेतकऱ्यांचा बळी जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. युवा शेतकऱ्याच्या निधनाने शोककळा पसरली आहे.
कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: April 06, 2015 12:24 AM