अमरावती : फेसबुकहून ज्या तरूणाने स्वत: अविवाहित असल्याचे सांगितले, लग्नाची बतावणी करून लैंगिक शोषण केले, तोच तरूण एका मुलाचा बाप निघाल्याची धक्कादायक बाब येथे उघड झाली. ते सत्य उघड होताच पीडिताने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. फ्रेजरपुरा पोलिसांनी याप्रकरणी यशोदानगर नं २ मधील शशांक (३६) नामक आरोपीविरूद्ध सोमवारी रात्री बलात्कार व धमकीचा गुन्हा नोंदविला.
तक्रारीनुसार, आरोपी शशांकने ऑक्टोबर २०२० च्या सुमारास तरूणीशी फेसबुकहून मैत्री केली. फेसबुक फ्रेंडपासून सुरू झालेल्या त्यांच्यातील मैत्रीचा प्रवास सोशल मिडियामुळे दूरपर्यंत गेला. मैत्री अधिक गाढ करुन आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. वेळोवेळी आपण लग्न करू, अशा आणाभाका घेतल्या. तिला प्रेम, मैत्रीच्या पुढे नेऊन लग्न करणार असल्याचा विश्वास दिला. मार्च २०२१ मध्ये रात्रीच्या सुमारास त्याने तिला फ्रेजरपुरा हद्दाीतील एका ठिकाणी नेले. आपले लग्न होणारच आहे. आपण लग्न करणारच आहोत, असे लग्नाचे आमिष देवून रस्त्याचे कडेला निर्जनस्थळी नेले. ती नकार देत असताना सुध्दा जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध केले. त्यानंतर वारंवार आरोपीने तिला भेटायला बोलावून कधी रोडवर, तर कारमध्ये नेऊन तिचे शारीरिक शोषण केले.
ती गोष्ट दडविली
आरोपी हा वारंवार लैंगिक शोषण करत असल्याने तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. आपण लग्न करू, दोघांचीही सामाजिक बदनामी होत असल्याचे तिने त्याला समजावून सांगितले. मात्र, आरोपीने त्यासाठी उद्या करू, परवा करू, असे म्हणत टाळाटाळ चालविली. २० डिसेंबर २०२२ रोजी पिडिताने त्यांच्यातील संबंधांबाबत आरोपीच्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यावेळी तो विवाहित असून एका मुलाचा बाप असल्याचे तिच्या लक्षात आले. सुमारे दोन वर्ष त्याने ती बाब तिच्यापासून दडवून ठेवली. ती बाब पिडिताला माहित पडली, ते समजताच केस करु नकोस, तुला पाहिजे ते देतो, अशी धमकी देखील त्याने पिडिताला दिली.