प्रतिक्रिया : बॅरि. अंतुलेसोबत अमरावतीतील अनेकांचा स्रेहाचा संबधअमरावती: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठनेते बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांचे मंगळवारी मुंबई येथील रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते मुख्यमंत्री असलेल्या कार्यकाळात त्यांच्या सोबतीने काम केलेल्या जिल्ह्यातील गणमान्य व्यक्तींच्या प्रतिक्रिया ‘लोकमत’ने जाणून घेतल्या. महाराष्ट्राने एक अभ्यासू आणि प्रचंड निर्णयक्षमता असलेला धडाकेबाज नेता गमावल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.डायनामिक मुख्यमंत्री होते : भैयासाहेब ठाकूरबॅरि. अंतुले हे महाराष्ट्राला लाभलेले डायनामिक मुख्यमंत्री होते. दिलेला शब्द ते पाळायचे मग त्याची कितीही किंमत मोजावी लागली तरी त्याची पर्वा नव्हती. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वकांक्षी निर्णय घेण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात मी आमदार होतो. धडाडीचा आणि हमखास निर्णय घेणारा असा नेता गेल्याने समाजाची आणि देशाची मोठी हाणी झाली, अशी प्रतिक्रिया माजी आमदार भैयासाहेब ठाकूर यांनी दिली.समस्यांची जाण असलेला नेता हरपला : वसुधा देशमुखबॅरि. अंतुले यांनी विदर्भातील लहान गावांना तालुक्याचा दर्जा दिल्यानेच विदर्भाचा विकास साधता आला. शहिदांचा त्यांनी सन्मान केला. प्रत्येक शहिदांच्या गावात त्यांचे स्मारक व वाचनालये सुरु केलीत. निराधारांना न्याय देण्यासाठी संजय गांधी योजना अंमलात आणली. त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळातच मला पाणीपुरवठा मंडळाचे अध्यक्षपद देऊन अमरावतीतील पाणी समस्या निकाली काढली. तळागाळातील जनतेच्या समस्यांची जाण असणारा नेता हरपला, अशी प्रतिक्रिया माजीमंत्री वसुधा देशमुख यांनी दिली.क्रांतिकारक मुख्यमंत्री होते : यशवंतराव शेरेकरबॅरि. अंतुले हे महाराष्ट्राला लाभलेले क्रांतिकारक मुख्यमंत्री होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक लोकपयोगी क्रांतिकारक निर्णय घेतले. एवढ्यावरच न थांबता ते अंमलातही आणलेत. इंदिरा गांधी यांच्या संकटकाळी त्यांनी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात संजीवनी दिली. फाटका माणूसही त्यांच्याकडे काम घेऊन गेला तर ते तातडीने त्याचे काम करायचे. अशा नेत्यासोबत आमदार व मंत्री म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्ष व देशाची हाणी झाली, अशी प्रतिक्रिया माजीमंत्री यशवंतराव शेरेकर यांनी दिली.महाराष्ट्रातील कर्तबगार नेतृत्व -सुरेंद्र भुयारबॅरि. अंतुले हे महाराष्ट्रातील कर्तबगार नेतृत्व होते. त्यांची मुख्यमंत्री पदाची कारकिर्द अतिशय चांगली राहिली. विदर्भ विकासाबाबत त्यांनी अनेक निर्णय घेतले. गोरगरिबांच्या हिताच्या अनेक योजना त्यांनी अंमलात आणल्या. त्यांच्या कार्यकाळात आमदार म्हणून मला अनेक चांगले अनुभव आले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हाणी झाली, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री सुरेंद्र भुयार यांनी दिली.काँग्रेस पक्षात पोकळी झाली-बबलू देशमुखबॅरि. अंतुले यांच्या निधनाने काँग्रेस पक्षात कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी सामान्य जनतेसाठी विविध योजना अंमलात आणल्या आहेत. ते काँग्रेस पक्षाचे सच्चे पाईक होते. त्यांच्या निधनाने जिल्हा काँग्रेस कमिटीत शोककळा पसरली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिली.
निर्णयक्षमता असलेला धडाकेबाज नेता हरपला
By admin | Published: December 02, 2014 10:57 PM