चार वर्षांच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष, संशोधन, सामाजिक योगदान, बांधीलकी, नावीन्यपूर्ण उपक्रमात पिछाडी
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मानांकनात गत चार वर्षात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. देशभरातील विद्यापीठाच्या मानांकनाचा अभ्यास करणारी स्किमॅगो जर्नल ॲण्ड कंट्री रँक या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. तत्कालीन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या कार्यकाळात संशोधन, सामाजिक योगदान, बांधीलकी, नावीन्यपूर्ण उपक्रम माघारल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
स्किमॅगो जर्नल ॲण्ड कंट्री रँक या संस्थेने अमरावती विद्यापीठाच्या सर्वसाधारण मुद्द्यांवर तसेच विशिष्ट, नेमक्या व महत्त्वाच्या अशा संशोधन, सामाजिक योगदान, सामाजिक बांधीलकी, इनोव्हेशन अर्थात नावीन्यपूर्ण, नवीन पुढाकार व नवीन उपक्रम या चार निकषांवर आधारित मानांकनात वर्ष २०१६ ते २०२१ या कालावधी दरम्यान घसरण झाल्याचे विविध आकडेवारी देऊन प्रकाशित केले आहे.
यात स्कोपस या जगप्रसिद्ध अशा गोषवारा व प्रशस्तीपत्राच्या आधारे संशोधन व अन्य निकषांच्या आधारे जगातील व भारतातील विद्यापीठाचे मूल्यमापन करणाऱ्या संस्थेने संबंधित विद्यापीठांच्या संकेत स्थळावरून व त्या देशातील मानांकन करणाऱ्या संस्थांकडे उपलब्ध असलेल्या संबंधित विद्यापीठाच्या विविध मुद्द्यांशी निगडीत सांख्यिकी माहितीच्या आधारावर हा अहवाल जारी केला आहे. त्या आकडेवारीचा उपयोग स्किमॅगो या संस्थेने केला आहे.
——————
मानांकनावर एक नजर...
२०१७ मध्ये देशातील सार्वजनिक विद्यापीठांचे, स्वायत्त महाविद्यालय, अभिमत विद्यापीठांचे एकत्रित सर्वसाधारण मानांकन करण्यात आले. यात अमरावती विद्यापीठ ४२ व्या क्रमांकावर होते. आता हे मानांकन २०२१ मध्ये घसरून १२५ वर आले आहे. तर २०२१ मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ६१ व्या स्थानावर, मराठवाडा विद्यापीठ ६४ व्या स्थानी, पुणे विद्यापीठ ४४ व्या स्थानावर, तर मुंबई विद्यापीठ ६० व्या स्थानावर असल्याचे स्पष्ट केले आहे.
०००००००००००००००००००००००००
विद्यापीठाच्या मानांकनाबाबत झालेल्या सर्वेक्षणाविषयी काहीही माहिती नाही. नेमके कशाच्या आधारे सर्वेक्षण झाले, हे कळले नाही; मात्र गत चार वर्षात विद्यापीठाने सर्वच क्षेत्रात संशोधन, सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावली आहे.
- तुषार देशमुख, कुलसचिव, अमरावती विद्यापीठ.