- गजानन मोहोड
अमरावती : पावसाळ्यात सरासरीपेक्षा २४ टक्क्यांनी कमी पाऊस व दिवसेंदिवस होत असलेला पाण्याचा प्रचंड उपसा, त्यातुलनेत न झालेले भूजल पुनर्भरण आदींमुळे विभागातील ४६ तालुक्यांतील भूजलस्तर १० फुटांपर्यंत कमी झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने ५६ तालुक्यांतील ६४७ निरीक्षण विहिरीतील पाण्याच्या पातळीची मोजमाप केल्यानंतर हा नित्कर्ष काढला. विभागात अकोला जिल्ह्यातील तीन तालुक्यांत १० फुटांपेक्षा भूजल पातळी खोल गेल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाण्यावी तीव्र टंचाई आहे. आठ तालुक्यांत दोन ते तीन मीटरपर्यंत खालावली आहे. यामध्ये अमरावती व अकोला तालुक्यात प्रत्येकी तीन तसेच वाशिम जिल्यातील दोन तालुक्यांचा समावेश आहे. एक ते दोन मीटरपर्यंत २३ तालुक्यांची पातळी खोल गेली. यामध्ये अमरावती जिल्यात पाच, अकोला जिल्यात एक, वाशिम जिल्ह्यात चार, व यवतमाळ जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा समावेश आहे. ० ते एक मीटरपर्यंत १२ तालुक्यांची पातळी खोल गेली यामध्ये अमरावती जिल्ह्यातील पाच, बुलडाणा जिल्ह्यातील चार, व यवतमाळ जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत १,३११ गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणवणार असल्याने १,६४१ उपाययोजना सयुंक्त स्वाक्षरी अहवालात विभागीय आयुक्तांना सुचविण्यात आल्यात, या कामांवर ११ कोटी ५४ लाखांचा निधी खर्च होणार आहे.विभागात २०१७ मधील पावसाळ्यात सरासरी ७७७.९ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ५८१.३ मिमी पाऊस पडला ही ७६ टक्केवारी आहे. पावसाच्या १२० दिवसांच्या तुलनेत फक्त ३६ दिवस पावसांचे राहिले. त्याचे साईड इफेक्ट आता जाणवायला लागले आहेत. केवळ बुलडाणा जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस झाल्याने या जिल्ह्यातील नऊ तालुक्यांच्या भूजल पातळीत ० ते दोनमीटरपर्यंत पाणीपातळीत वाढ झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या वैज्ञानिक केतकी जाधव यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
अचलपूर तालुक्यातील पातळी सर्वाधिक कमीविभागात सर्वाधिक अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात उणे ७.१८ मीटरपर्यंत, अंजनगाव सुर्जी उने ३.२१ पातळी कमी झालेली आहे. अकोला जिल्ह्यात तेल्हारा उणे ४.६४, बाळापूर उणे ३.९३, पातूर उणे ३.०४ मीटरपर्यंत पातळी खोल गेली आहे. या तालुक्यांमध्ये भूजल उपशावर निर्बंध ठेवणे आवश्यक आहे. नवीन विंधन विहीर खोदण्यास महाराष्ट्र भूजल (विकास आणि व्यवस्थापन) २००८ मधील ८(१) या तरतुदी अन्वये बंदी घालणे आवश्यक आहे.
विभागात यंदा पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे जमिनीचे पुनर्भरण झालेले नाही. त्यातुलनेत उपसा मात्र अधिक होत आहे. परिणामी विभागातील ४६ तालुक्यांतील भूजल पातळी शून्य ते तीन मीटरपर्यंत खाली आली आहे.- पी. व्ही. कठाणेउपसंचालक, जीएसडीए