लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीपासून कोरोना विषाणून्या वाढत्या संसर्गाचा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. शाळा महाविद्यालये बंद आहेत. लग्न प्रसंगावर आलेल्या निर्बंधामुळे एस.टी.महामंडळाच्या प्रासंगिक करारावरील आरक्षण नसल्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नाला उतरती कळा आली आहे. परिणामी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्नही बुडाले आहे.दरवर्षी एसटी महामंडळाच्या एस.टी बसेस शाळा महाविद्यालयाच्या शैक्षणिक सहली आणि विवाह समारंभासाठी हजारोंच्या संख्येने एसटी बसेस प्रासंगिक करारावर आरक्षित केल्या जातात. परंतु, मार्च २०२० पासून जिल्ह्यासह सर्वत्र कोरोना विषाणूच्या संकटामुळे सर्वत्र चितेंचे वातावरण पसरले आहे. परिणामी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गतवर्षी लॉकडाऊनमुळे बजारपेठेसह, शाळा, महाविद्यालये, एसटी बसेसही बंद ठेवण्यात आल्या. विविध कार्यक्रमांवर बंदी घातली गेली. यानंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक केल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येताच यात शिथिलता देण्यात आली. असे असले तरी अद्याप कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने अजूनही कोरोनाची वाढती चिंता कायम आहे. परिणामी शाळा, महाविद्यालये बंदच आहेत. परिणामी शैक्षणिक सहलीवरही विरजण पडले आहे. लग्नकार्यावरही काहीशी शिथिलता असली तरी मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकविले जात आहे. परिणामी एसटी महामंडळाच्या शैक्षणिक सहलींचे उत्पादनावर झाला आहे. शैक्षणिक सहल व लग्नकार्यात लालपरी धावल्याने हक्काचे उत्पन्नावर पाणी फिरले असून एसटी महामंडळाची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९ मध्ये जिल्ह्यातील ८ आगारातून १,५९० बसेसचे आरक्षण करण्यात आले होते. यापोटी महामंडळाला २८ कोटी ६२ लाख ८५ हजार ५६ रुपयांचे उत्पन्न मिळाले. जानेवारी ते डिसेंबर २०२० मध्ये केवळ २८३ बसेस आरक्षित करण्यात आल्या होत्या. यापोटी ५३ लाख १४ हजार ९३१ रुपयांचे उत्पन मिळाले. मात्र, सन २०१९ या वर्षात बसचे आरक्षण अधिक होते. उत्पन्नही कोट्यवधीत मिळाले, तर २०२० मध्ये बसेस आरक्षण नगण्य होते. अन् उत्पन्नही बरेच घटले आहे. अशातच २०२१ या वर्षात ना बसचे आरक्षण अन् प्रवाशांअभावी एस.टी.महामंडळाचे कोट्यवधीचे उत्पन्न बुडाले आहे.
गतवर्षी केवळ २८३ बसचे आरक्षण गतवर्षी कोरोनाचा वाढता संसर्गामुळे ८ आगारामधून केवळ २८३ बसेस सहल आणि विवाह समारंभासाठी आरक्षण करण्यात आले होते.यामध्ये केवळ ५३ लाख १४ हजार ९३१ रूपयाचे उत्पन्न मिळाले तेव्हापासून मात्र एकाही एसटी बसचे आरक्षण झाले नाही.
कोरोनामुळे शाळा महाविद्यालय बंद आहेत. लग्नकार्यालाही मर्यादा असल्याने शैक्षणिक सहली असो वा लग्नाकरिता बसेसचे बुकिंग नाही. त्यामुळे एसटीला हक्काच्या उत्पन्नापासून मुकावे लागले. कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर एसटीला उत्पन्नाची अपेक्षा आहे. - श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक