गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रासायनिक खतांचा अनिर्बंध वापरासह सतत पाण्याखाली राहिल्याममुळे जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. ती खतांना प्रतिसाद देत नाही. दिवसेंदिवस सेंद्रीय कर्बाचे प्रमाणात कमी आढळून येत आहे. तसे निरीक्षण ५८,५६८ नमुन्यांच्या चाचनीनंतर मृद् सर्वेक्षण चाचणी प्रयोगशाळेद्वारा नोंदविण्यात आलेले आहे.जमीन हा पुनर्निर्माण न होणारा स्त्रोत असल्याने संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. पोत खराब होत असल्याने उत्पादन खर्च वाढून अपेक्षित परिणाम साध्य होत नाही. त्यामुळे जमिनीची आरोग्य तपासणी महत्त्वाची आहे. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते, शिफारशींनुसार पिकास समतोल प्रमाणात खतांची मात्रा देता येते. याद्वारे भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म टिकविण्यास मदत होते. शेतातील मातीचा नमुना तपासल्यानंतर जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक (पीएन व सामू), क्षारता, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध स्फुरद, पालाश, नत्र, तांबे, लोह, जस्त, मंगल, बोरॉन व गंधक आदी घटकांचे पिकांना आवश्यक असणारे प्रमाण कळते. यासाठी माती नमुना घेण्याचीदेखील विशिष्ट पद्धत आहे. नमुना पिके काढण्यापूर्वी किंवा काढल्यानंतर घ्यावा लागतो. गुरे बसण्याची किंवा झाडाखालील जागा नको, खते व कचरा टाकल्याची जागा, बांधाजवळचे क्षेत्राजवळील नमुना घेऊ नये. शिफारशीनुसार शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर करावा, असे जिल्हा कृषी विभागाने सांगितले.
क्षारयुक्त जमिनीसाठी उपाययोजनाक्षार संवेदनशील क्षेत्रात तूर, वाटाणा, तीळ, मुळा, चवळी, घेवडा, भेंडी, कोबी, रताळी, संत्री, मोसंबी, लिंबू व आंबा पिके घ्यावीत. मध्यम प्रकारात भात, ज्वारी, गहू, ज्वारी, मका, बाजरी, मोहरी, करडई, सूर्यफूल, एरंडी, सोयाबीन, भुईमूग, टोमॅटो, कांदा, बटाटा, गांजर, लसूण व काकडी तसेच पाण्याच्या वापरामुळे क्षाराचे प्रमाण वाढल्यास जिप्समच्या मात्रेचा वापर करावा.
सुपिकता वाढविण्यासाठी ही उपाययोजना जमिनीत आम्ल जास्त वाढल्यास हेक्टरी ०.५ ते २.५ टन चुनखडीची पावडर वापरावी. विम्लयुक्त प्रमाण जास्त आढळल्यास चर खोचून पाण्याचा निचरा करावा व जिप्समपूड सेंद्रीय खत व प्रेसमड द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासल्यास सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा, लोहाची कमतरता असल्यास फेरस सल्फेट, हेक्टरी २५ ते ३० किलो वापरावे, तांब्याची कमतरता असल्यास कॉपर सल्फेट हेक्टरी १० ते १२५ किलो वापरावे, मंगल कमी असल्यास मॅगनीज सल्फेट हेक्टरी १० ते २५ किलो वापरावे.
जमिनीची उत्पादकता १६ घटकांवर अवलंबूनमुख्य अन्नघटक : हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नत्र, स्फुरद व पालाश दुय्यम अन्नघटक : कॅल्शिअम, मॅग्नेशियम व गंधकसूक्ष्म अन्नघटक : लोह, मंगल, तांबे, जस्त, मॉलिब्डेनम, बोरॉन व क्लोरिन
मातीपरीक्षण आधारित खतांचा वापर करावा. खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे, सेंद्रिय कर्बाचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून येते. यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा.- प्रफुल्ल सातव जिल्हा मृद् सर्वेक्षण, मृद् चाचणी अधिकारी