लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हरिसालच्या आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याला धारणी पोलिसांनी अटक केली. मात्र, विनोद शिवकुमार बाला याच्या शारीरिक, मानसिक त्रासाची एकटी दीपाली याच बळी ठरल्या नाही, तर ४० महिला वनरक्षक, तीन महिला वनपालदेखील त्रस्त असल्याची माहिती ‘लोकमत’ला प्राप्त झाली. बाला याच्याकडे गुगामल वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक पदाची जबाबदारी होती. हरिसाल, तारूबांदा, चौराकुंड व चिखलदरा असे चार रेंज त्याच्या अधिनस्थ होते. मात्र, मराठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतत त्रास देत त्यांना कमी लेखणे ही त्याची कार्यशैली होती. महिला कर्मचाऱ्यांना असभ्य भाषेत बोलणे, ही बाला याची नित्याचीच बाब होती, असे हरिसाल येथील काही महिला वनरक्षक, वनपालांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. मोबाईल अथवा वायरलेसवर मॅसेज देताना कामे करूनसुद्धा प्रतिउत्तर देणाऱ्या महिला वनपाल, वनरक्षकांना तो ‘टार्गेट’ करायचा. महिला वनरक्षक या पायदळ जंगल भ्रमंती करतानाचे माेबाईलवर छायाचित्र पाठविल्यानंतरही ते मिळाले नाही, असे म्हणत पुन्हा जंगलात जा, गस्त घाला, कर्तव्याचे नव्याने छायाचित्र पाठवा, असा आग्रह धरून विनोद शिवकुमार बाला हा महिला वनकर्मचाऱ्यांंना शारीरिक व मानसिक त्रास देत होता. बाला याची दैनंदिनी डायरी, वाहनांचे लॉकबूक, विश्रामगृहाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले, तर दीपाली चव्हाण या महिला अधिकाऱ्यांसह अन्य महिला वनकर्मचारीसुद्धा किती त्रस्त होत्या, हे स्पष्ट होईल.
बाला याचे रात्रीअपरात्री संरक्षण कॅम्पमध्ये दौरे मेळघाटात अतिशय वादग्रस्त आणि उर्मट अशी शैली असलेल्या विनोद शिवकुमार बाला याची आता नवनवीन कार्यशैली समाेर येत आहे. चिखलदरा, ढाकणा, तारूबांदा येथील संरक्षण कॅम्पवर अपरात्री दौरे कशासाठी केले, याचा सखोल तपास केला तर, बाला याच्यापासून वनकर्मचारी कसे त्रस्त होते, हे समोर येईल. बाला याचे वारंवार दौरे कशासाठी हा मुद्दा पोलिसांनी निखंदून काढावा, अशी मागणी जोर धरत आहे.
वाहनचालकाला ताब्यात घेऊन चौकशी कराविनाेद शिवकुमार बाला याच्या दिमतीला असलेले शासकीय वाहनचालकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे दौरे कुठे व कशासाठी झालेत, हे समोर येईल. बाला याला शासकीय निवासस्थान असताना उशिरा रात्री विश्रामगृहावर कशासाठी मुक्काम? हे वास्तव वाहनचालक सांगू शकेल. विश्रामगृहाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तर ‘दुध का दुध, पाणी का पाणी ’ झाल्याशिवाय राहणार नाही, अशी चर्चा जोर धरत आहे.
दौऱ्यात सहायक वनसंरक्षक का नाही? तारूबांदा, चौराकुंड, हरिसाल, चिखलदरा व ढाकणा वनपरिक्षेत्रात उपवनसंरक्षक विनोद बाला हा दौरे करायचा. तेव्हा सहायक वनसंरक्षक सोबत का राहत नव्हते, हा गंभीर सवाल आहे. खरे तर एखाद्या भागात उपवनसंरक्षकांना दौऱ्यावर जायचे असल्यास सहायक वनसंरक्षकांना सोबत नेणे अनिवार्य असते. मात्र, बाला हे एसीएफ यांना बायपास करून दौरा करायचा. एकट्याचा दौरा कशासाठी, हे स्पष्ट होईल.