मनीष गवई यांनी दिल्ली येथे अध्यक्षांची घेतली भेट, सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्त करण्याची मागणी
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांचे आत्महत्या प्रकरण आता दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाकडे पोहोचले आहे. अल्पसंख्याक आयोगाचे सल्लागार सदस्य तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे राज्यपाल नामित सिनेट सदस्य मनीष गवई यांनी गुरुवारी महिला आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली आणि या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. निवेदनाद्वारे दोषींना कठोर शासन करण्याची मागणी केली.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांना दिलेल्या निवेदनातून गवई यांनी आरएफओ दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार पानांचे सुसाईड नोट लिहून ठेवले आहे. यात गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्या शारीरिक, मानसिक त्रासाने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. यात विनोद शिवकुमार याला पोलिसांनी अटक करून गुन्हा नोंदविला आहे. हल्ली विनोद शिवकुमार हा न्यायालयाच्या आदेशाने त्याची कारागृहात रवानगी केली आहे. मात्र, आयएफएस लॉबीमुळे दोषी असलेल्या अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी याच्याविरुद्ध गुन्हे नाेंदविण्यात आले नाही. राज्याच्या वन मंत्रालयाने रेड्डी याचे निलंबन केले असून, दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे, अशी कैफीयत मनीष गवई यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांची भेट घेऊन मांडली. दीपाली आत्महत्याप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्त करण्याची मागणी गवई यांनी केली. बीभीषण जाधव, मारुती पवार याप्रसंगी उपस्थित होते.
-----------------------------