अमरावती : फेसबुकहून झालेली ओळख एका विवाहितेच्या संसारात विष कालवण्यास कारणीभूत ठरली. आरोपीने तिच्यासह तिच्या पतीला अश्लील ईमेल करून बदनामी चालविली आहे. तो ‘सोशल’ त्रास असह्य झाल्याने अखेर तिने पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी ८ जानेवारी रोजी रात्री ११.३५ च्या सुमारास आंध्रप्रदेशातील प्रसिद्ध तिरूपती येथील नरेश नरसिंहा गोगटी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, सन २०१९ मध्ये येथील एका तरुणीची फेसबुकच्या माध्यमातून आरोपी नरेशशी ओळख झाली. ते दोघे मॅसेंजर ॲपद्वारे चॅटिंग करायचे. पुढे ती ओळख कॉलपर्यंत देखील गेली. त्यांच्यात अमरावती टू तिरूपती अन् तिरूपती टू अमरावती असे कॉल व्हायचे. मात्र आरोपी वारंवार फोन करत असल्याने तिने ती विवाहित असल्याची जाणीव त्याला करून दिली. माझे लग्न झाले आहे, मला फोन करू नको, असे तिने बजावले. मात्र त्यावर आरोपीने तिला व तिच्या पतीला शिवीगाळ करणे सुरू केले.
आरोपी हा १ नोव्हेंबर २०२२ पासून तिला ईमेलवर अश्लील शिवीगाळ करून त्रास देत आहे. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तिच्यासह तिच्या पतीला देखील अश्लील ई मेल करत शिवीगाळ चालविली आहे. आरोपी नरेशने फेसबुकवर आपली बदनामी चालविल्याचेही विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. ७ जानेवारी २०२३ पर्यंत ती मालिका सुरूच राहिली. अखेर तिने पतीला विश्वासात घेत ८ जानेवारी रोजी रात्री फ्रेजरपुरा पोलिस ठाणे गाठले.
संबंधित महिलेच्या तक्रारीवरून तिरुपतीच्या नरेश गोगटी नामक आरोपीविरुद्ध विनयभंग, धमकी व बदनामीचा गुन्हा दाखल केला. तिच्या पतीलाही अश्लील इ मेल करण्यात आले.
- नितीन मगर, पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा
फेसबुकवरील फ्रेंड रिक्वेस्ट पुरेशी खातरजमा करूनच एक्सेप्ट करा. सोशल मीडियावरील अनोळखींची ओळख आपल्याला कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पाडू शकते.
- रवींद्र सहारे, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर