अमरावती : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या अखत्यारितील ग्रामीण भागातील अनेक गावांतील अंगणवाडी केंद्रांच्या इमारती शिकस्त झाल्या आहेत. त्यामुळे या इमारतींचे नव्याने बांधकाम करणे आवश्यक आहे. त्याकरिता निधीची तरतूद करावी, असा प्रस्ताव सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी विशेष सभेत मांडला. हा प्रस्ताव अध्यक्षांनी मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्र्वासन सभेत दिले.
महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत १४ तालुक्यांतील विविध गावांत अंगणवाडी, मिनी अंगणवाडी केंद्र आहेत. तेथे चिमुकल्यांना शिक्षणाची गोडी लागावी याकरिता ज्ञानार्जन केले जाते. मात्र, हे कार्य ज्या अंगणवाडी केंद्रातून केले जाते त्या केंद्राच्या अनेक गावांतील इमारती शिक़स्त झाल्या आहेत. अशा ठिकाणी चिमुकल्यांना बसविणे धोकादायक ठरते. त्यामुळे अशा अंगणवाडी केंद्राच्या दुरुस्ती व नवीन इमारतीचे बांधकाम होणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता जिल्हा परिषद विकास आराखड्याच्या निमित्ताने निधीची तरतूद करून ही कामे करावी, असा प्रस्ताव सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी मांडला. तो क्षणात अध्यक्षांनी मान्य करून निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. यावेळी सभापती पुजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे, महिला व बालकल्याणचे डेप्युटी सीईओ प्रशांत थोरात यांच्यासह सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते.