बडनेरा : आर्थिक दुर्बल घटकांमध्ये मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे धोरण आहे. ही प्रक्रिया शासनाने आॅनलाईन केली आहे. संकेतस्थळाच्या सदोषामुळे बडनेरासह, अमरावतीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून मुकावे लागले होते. या एका तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली आहे. मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत सर्व खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये अनुसूचित जाती-जमाती, अन्य मागासवर्गीय तसेच आर्थिक दुर्बल घटकामध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्ले ग्रुप, केजी १,२ व १ ते ४ वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे धोरण आहे. यासाठी यावर्षापासून शासनाने ही प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. त्याचा संकेत स्थळ देण्यात आला होता. त्याची मुदतदेखील शासनाने ठरवून दिली होती. बडनेरा व अमरावतीच्या कित्येक विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दिलेल्या संकेतस्थळाने स्वीकारलेच नसल्याच्या तक्रारी पालकांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महानगर अध्यक्ष सुरेंद्र टेंभूर्णे यांच्याकडे केली होती. सदरची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्यावर त्यांनी याची दखल घेत संचालक शिक्षण विभाग पुणे यांना एका पत्राद्वारे पालकांच्या तक्रारीची दखल घ्यावी, असे लेखी कळविले आहे. सदोष संकेतस्थळामुळे आॅनलाईन प्रवेशापासून वंचित राहिलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना लेखी स्वरुपात अर्ज भरण्याची मुभा शिक्षण विभागाने द्यावी. ज्यामुळे या घटकातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची गांभीर्याने दखल घ्यावी.- सुरेंद्र टेंभुर्णे,अध्यक्ष, अम. महानगर पीपल्स रिपब्लिकन पार्टी.
सदोष आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया तक्रार : जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ घेतली दखल
By admin | Published: March 29, 2015 12:32 AM