लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरणऐवजी पाण्याचा अनिर्बंध उपसा होत आहे. परिणामी जिल्ह्याची भूजलपातळी पाच वर्षांच्या तुलनेत १५ ते २४ फुटांपर्यंत खालावली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने मे महिन्याअखेर १७० निरीक्षण विहिरींच्या पातळीच्या नोंदीद्वारे हे धक्कादायक निरीक्षण नोंदविले. विशेष म्हणजे अचलपूर, अंजनगाव व चांदूरबाजार तालुक्यात पाण्याचा अनिर्बंध उपसा होत असल्याने विदर्भातील ५६ तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक भूजलस्तर खालावला असल्याचे वास्तव आहे.भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे जिल्ह्यातील १७० निरीक्षण विहिरीच्या स्थिर पातळीचे सप्टेंबर, डिसेंबर, मार्च व मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात निरीक्षण नोंदविण्यात येते. त्याची तुलना पाच वर्षांच्या भूजलपातळीशी केल्यानंतर जीएसडीएद्वारे निरीक्षण नोंदविण्यात येते व त्याद्वारे लघुपाणलोट ( रन आॅफ झोन) क्षेत्रातील भूजलपातळीची स्थिती माहिती होते. यंदा मे महिन्यातील अखेरच्या आठवड्यात निरीक्षण विहिरींची नोंद घेतली असता, पाच वर्षांपूर्वी याच दिनांकाला जिल्ह्याची भूजलपातळी ९.५७ मीटर होती. त्याच्या तुलनेत यंदा १२.१७ मीटर आहे. म्हणजेच पाच वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यातील भूजलात सरासरी २.६० मीटरने कमी आलेली आहे. चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक ७.९३ मीटर, अचलपूर ७.७० मीटर व अंजनगाव सुर्जी तालुक्यात ५.४९ मीटरने भूजलस्तर खालावला असल्याचे स्पष्ट झाले आहे.अमरावती जिल्ह्यातील ७५ टक्के भूभाग बसॉल्ट खडकाने व २५ टक्के पूर्णा नदीच्या गाळाने व्यापला आहे. या ठिकाणी सरासरी १० ते १२ मीटर खोलीपर्यंतचा भाग भूजल पुनर्भरणास योग्य आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात मागील चार वर्षांत सरासरी २५ ते ३५ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत झपाट्याने कमी आलेली आहे. विशेष म्हणजे, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाने भूजल पुनर्भरण होणे महत्त्वाचे आहे. मात्र, याच काळात पावसाचा ताण राहिल्याने पुनर्भरणाऐवजी पिकांसाठी उपसा झाला व नंतरच्या काळातदेखील निरंतर होत राहिला. यासोबतच शहरात पाण्याचा अतिरिक्त वापर, औद्योगिक वापरामुळेही भूजलस्तरात मोठ्या प्रमाणावर कमी आली. जिल्ह्यातील ३५० वर गावांचे पाण्याचे स्रोत कोरडे पडल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे.जलयुक्त शिवारचे ३१८ कोटी पाण्यातपावसाचे पाणी शिवारात जिरवून शेती समृद्ध व्हावी व याद्वारे भूजलस्तरदेखील वाढावा, यासाठी जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची १६ हजार १४२ कामे तीन वर्षांत करण्यात आली. यावर ३१८ कोटी ७८ लाखांचा खर्च झाला. याद्वारे ७५८ गावे जलपरिपूर्ण झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला. प्रत्यक्षात संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची टंचाई आहे व भूजलस्तरदेखील २४ फुटांपर्यंत खालावल्याने या उपक्रमाची जिल्ह्यात पुरेवाट झाल्याचे वास्तव आहे.अमरावती शहरात१६ फुटांपर्यंत भूजलस्तर कमीअमरावती तालुक्यात १४ फुटांपर्यंत व शहरात १५ ते १६ फुटांपर्यंत भूजलात कमी आल्याची माहिती आहे. शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ३५०० हातपंप व २० हजारांवर बोअरद्वारे अमर्याद उपसा होत आहे. याव्यतिरिक्तही रस्ते कामांसाठी दुभाजकावरच बोअरचे खोदकाम कंत्राटदारांनी केले आहे. त्याद्वारे प्रचंड उपसा होत आहे. या तुलनेत पुनर्भरण झालेले नाही. ही आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे.दोन वर्षांत १२५ दिवस पावसाचा खंडमागील वर्षी जून महिन्यात १३ दिवस, जुलै ८, आॅगस्ट १४ व सप्टेंबर महिन्यात २६ दिवस असे एकूण ६६ दिवस पावसात खंड राहिला. त्यापूर्वी सन २०१७ मध्ये जून महिन्यात १४ दिवस, जुलै ८, आॅगस्ट १७ व सप्टेंबर महिन्यात १४ दिवस असे एकूण ५९ दिवस पावसात खंड राहिला. साधारणपणे पावसाचे १२० दिवस असतात. म्हणजेच दोन वर्षातील २४० दिवसांपैकी १२५ दिवस पावसात खंड राहिला. त्यामुळे भूजल पुनर्भरणाऐवजी उपसा जास्त झाल्याचे वास्तव आहे.
भूजलात २४ फुटांपर्यंत तूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 1:41 AM
सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरणऐवजी पाण्याचा अनिर्बंध उपसा होत आहे. परिणामी जिल्ह्याची भूजलपातळी पाच वर्षांच्या तुलनेत १५ ते २४ फुटांपर्यंत खालावली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने मे महिन्याअखेर १७० निरीक्षण विहिरींच्या पातळीच्या नोंदीद्वारे हे धक्कादायक निरीक्षण नोंदविले.
ठळक मुद्देजून महिन्यातील स्थिती : अचलपूर, चांदूरबाजारसह अंजनगाव तालुक्यासाठी धोक्याची घंटा