अंजनगावात लाकूड तस्करांकडून सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच जणांना अटक
वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हसनापूर येथे आडमार्गावर येणाऱ्या डॉक्टर राजेंद्र कोकाटे व जयस्वाल यांच्या शेतात १२ ऑगस्टच्या मध्यरात्री रखवालदाराला जिवे मारण्याची धमकी देऊन अवैध वृक्षतोड करण्यात आली. याप्रकरणी अंजनगाव पोलिसांनी पाच जणांना अटक केली.
संबंधित वृक्षतोड करणारे तस्कर हे मध्यरात्री शेतात दिसल्यावर तेथील रखवालदार आठवलेंनी हटकले असता, त्याला ‘तू तेरा काम कर, सो जा, नही तो कटरसे काट देंगे’ अशी धमकी देत वृक्षतस्करांनी शेतातील बाभळीचे मोठे तोडून नेले. या घटनेची तक्रार दाखल होताच अंजनगाव सुर्जी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे व्यापारी असलेले आरोपी सै. सलीम (२१), शहनवाज शाह (२१), मोहसीन शाह (३०), सैयद कलीम शेख (२१) व शेख सलमान (२७, सर्व रा. अजीजपुरा) यांना अटक केली. अंदाजे पाच टनाची २५००० रुपयांची बाभळीची खोडे, पाॅवर कटर व एमएच ०४ ईबी ८६३३ क्रमांकाचे वाहन असा एकूण १ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला. यापूर्वीही या आरोपींनी पथ्रोट हद्दीत अशा प्रकारे गुन्ह्यास अंजाम दिला होता. अंजनगाव पोलिसांनी २४ तासांमध्ये शोधमोहीम राबवून आरोपींच्या मुसक्या आवळल्या, हे विशेष. ही कारवाई ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप काईट, स्थानिक गुन्हे शाखेचे सुभाष राठोड, विजय शेवतकर, कॉल्स्टेबल सूर्यकांत कांदे, चव्हाण यांनी केली. या प्रकरणातील पसार आरोपी शेख फारूख याचा शोध अंजनगाव सुर्जी पोलीस करीत आहेत.