अमरावती : मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई शैक्षणिक वर्षासाठीच्या २५ टक्के जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची लॉटरी जाहीर झाली. मात्र, लॉकडाऊनमुळे कागदपत्रे पडताळणी करू नये, असा आदेश असल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. त्यामुळे पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.
आरटीई प्रवेशाच्या आशेवर असणारे पालक यंदा उशिरा सुरू होत असलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे हवालदिल झाले आहेत. गतवर्षी देखील लॉटरी जाहीर झाल्यानंतर लॉकडाऊनमुळे कागदपत्र पडताळणी करण्यात आली नाही. लाकडाऊन वाढल्याने कागदपत्र पडताळणीचा अधिकार शाळांकडे देण्यात आला. मात्र, शाळांनी कागदपत्र पडताळणी सुरुवातीला विरोध दर्शविला. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेस विलंब लागला. त्याचीच पुनरावृत्ती यंदा होत आहे. यापूर्वी आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्या घेतल्या जात होत्या. गतवर्षी देखील पहिली फेरी घेतली त्यानंतर प्राधान्यक्रमानुसार प्रवेश देण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे ही प्रक्रिया आणखी वेळ खाऊ झाली आहे, अशा प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या आहेत.