अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भाग घेरला गेला. यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. ग्रामीण भागात अनेक आजारांवर घरगुती उपचाराची पद्धत आहे. कोरोनावरही गुळवेलचा काढा, हळद, तुळस आदींचा वापर ग्रामस्थ करीत असल्याचे चित्र आहे.
मार्च महिन्यांपासून जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील एकूण १,२२५ गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यातच २४८ गावे हॉटस्पॉट ठरले आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढल्याने ग्रामस्थांमध्ये कोरोनाची भीती वाढली आहे. या भीतीतूनच अनेकजण लक्षणे नसली तरी घरगुती उपचार करीत असल्याचे वास्तव आहे. यात वाफ घेणे, हळद दुधातून किंवा पाण्यातून घेणे, तुळस, अश्र्वगंधा आदींचा उपयोग करण्यात येत आहे. ग्रामीण भागात अजूनही ताप आल्यास अनेकजण कडुनिंबाच्या पानाचा रस पितात. वयोवृद्ध मंडळी विविध आजारांवर घरगुती उपचार सुचवितात. सध्या ग्रामीण भागात गुळवेलच्या काढ्याला मागणी वाढली आहे. कडुनिंबाच्या झाडावर वाढलेली गुळवेल गुणकारी आहे.
-----------------
आयुर्वेद हा संपन्न वारसा लाभलेल्या औषध चिकित्सेतील उत्तम पर्याय आहे. आयुर्वेदात जठराग्नीला प्रमुख महत्त्व दिलेले आहे. जेठराग्नी सक्षम असेल तर घेतलेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते. अग्नी प्रदिप्त ठेवणे हीच प्रथम चिकित्सा आहे. सम्यक आहार, विहार, व्यायाम, प्राणायम, योगा या घटकाचा वापर करावा.
- आश्लेषा वानखडे, आयुर्वेदाचार्य
-----------------
कशाच्या काय फायदा?
हळदीमुळे वाढते रोग प्रतिकारशक्ती
हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढते. रक्त शुद्ध होते. त्वचेचा रंग उजळतो. ही जंतुनाशक आहे. ही वनस्पती बारामाही आहे. हळद चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने हृदयविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदूच्या विकारापासून संरक्षण मिळते. पचनक्रिया सुधारते.
------------
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी
आवळ्यामध्ये सी व्हिटॅमिन असते. त्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोज आवळ्याचे सेवन करणे आवश्यक आहे. यातील जीवनसत्वामुळे त्वचेतील पेशी जलदगतीने दुरुस्त होतात. व्हिटॅमिन सी आपल्या डोळ्यातील रक्तवाहिन्यांमध्ये अनावश्यक चरबी जमा होण्यापासून रोखण्याचे कार्य करते.
-----------------------
गुळवेलचा वापर वाढला
गुळवे, कफ कमी करण्यास मदत करते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवते. यामुळे दमा आणि खोकला यासारख्या आजारापासून बचाव होतो आणि फुफ्फुसांना निरोगी ठेवता येते. तसेच गुळवेल हे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठ, गॅस व इतर समस्या दूर करण्यास मदत करते. त्यामुळे गुळवेल लाभदायक आहे.
-------------
आजीबाईंच्या बटव्यात काय?
मीठ व गरम पाण्याने गुळण्या केल्यास घसा दुखणे कमी होते. तसेच गुळवेलचा काढा घेतल्यास ताप, सर्दी खोकला कमी होतो. त्यामुळे काढ्याचा उपयोग करतो.
- किरण गोपाळराव खांडेकर
------------
कोरोना झाल्यानंतर सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे असतात. यावर आधीपासून घरगुती उपचार करण्यास येतात. ताप असल्यास आम्ही गुळवेलचा काढा घेतो. तसेच कडुनिंबाच्या पाल्याचा रसही तापावर गुणकारी ठरतो.
- पार्वताबाई किसनराव पांडे
--------------
सर्दी, कफ वाढल्यास गरम पाण्याची वाफ घ्यावी तसेच तुळस, मिरे, लवंग, दालचिनी, सूंठ आदी एकत्रित करून त्याचा काढा आम्ही घेत असतो. हाच उपाय ती इतरांना सांगते.
- शारदा मनोहराव बांबोडे