लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पानी फाउंडेशनच्या पुढाकाराने पौष्टिक गवत निर्मितीकरिता पाणीदार गाव म्हणून गव्हाणकुंड आणि सावंगा येथे नर्सरी तयार करून जनावरांच्या चाऱ्याची सुविधा करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.जनावरांच्या पौष्टिक चाऱ्याची निकड भरून निघावी, यासाठी गतवर्षी गव्हाणकुंड ग्रामस्थांनी १० गुंठे जमिनीत नऊ प्रकारच्या वेगवेगळ्या प्रजातीच्या पौष्टिक गवताची लागवड करून आठ महिन्यांदरम्यान नर्सरीतून गवताची तीनदा कापणी केली. गवताचे बी व गवताची थोंबे वाढल्याने एका रोपापासून २० पेक्षा अधिक रोपे तयार झाली.
वरूड तालुक्यातील सावंगा या गावातही लोकसहभागातून यंदा ग्रामस्थांनी सरी पाडून बेड तयार करून पाच गुंठ्यात गवताची लागवड केली आहे. यामध्ये प्रामुख्याने दशरथ, पवना, काळे अंजन, पांढरे अंजन, मारवेल, गिनी गवत, डोंगरी गवत या सर्व उत्तम पौष्टिक गवताच्या वाणाचा वापर करण्यात आला आहे.
दुधाळ जनावरांसाठी हे पौष्टिक गवत वरदान आहे. गाई, म्हशी, बैल, बकरी, पाळीव प्राणी आणि गवत खाणारे वन्यप्राणी यांचे आरोग्य उत्तम राहते व यापासून मिळणारे उत्पन्नही जास्त मिळते. दशरथ व छाया गवत बकरीसाठी खूपच पौष्टिक आहे त्याचप्रमाणे इतरही गवत प्राण्यांसाठी पौष्टिक आहे. गवताची लागवड व महत्त्व यावर्षी चालू झालेल्या 'समृद्ध गाव' स्पर्धेच्या माध्यमातून गावकऱ्यांना चमूचे मार्गदर्शन मिळाले.
वरूड तालुक्यातील कुरणधन वाढविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या मदतीने यशस्वी होईल आणि गावागावांमध्ये संरक्षित कुरणक्षेत्र विकसित झालेले पाहायला मिळतील, असा विश्वास तालुका समन्वयक आरती खडसे यांनी व्यक्त केला.