अमरावती : नवे शैक्षणिक सत्र महिनाभरात सुरू होईल. त्यामुळे शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. शाळेच्या प्रारंभावर कोरोनाचे सावट असले तरी नव्या पुस्तकांची तजवीज केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील यावेळी १७ लाख ०८७३ हजार पाचशे पुस्तकांची मागणी बालभारतीकडे नोंद झाली आहे. समग्र शिक्षा अभियानात दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविली जातात. यंदाही २०२१-२२ साठी शिक्षण विभागाने सर्व पंचायत समित्यांकडून पुस्तकांची मागणी मागविली होती. त्यानुसार प्राथमिक शिक्षण परिषदेच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्याचे नियोजन करून पाठ्यपुस्तकांची मागणी बालभारतीकडे नोंदविण्यात आली आहे. १७ लाख ८०७३ पाठ्यपुस्तके बालभारतीच्या स्थानिक पाठ्यपुस्तकालयाच्या केंद्रातून जिल्ह्यातील विविध तालुक्यांत वितरित केली जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागातून सांगण्यात आले. सदर पाठ्यपुस्तके जिल्हा परिषद, नगर परिषद आणि शासकीय अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तके मोफत दिली जाणार आहेत.
बॉक्स
जुन्या पुस्तकांचाही होणार पुनर्वापर
दरम्यान, २०२०-२१ या सत्रातील विद्यार्थ्यांना जी पाठ्यपुस्तके देण्यात आली होती. ती यंदा शाळेत जमा करून घेतली जाणार आहेत. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या निर्देशानुसार या पुस्तकांचा पुनर्वापर केला जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने पुस्तके जमा करण्याबाबत पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वर्गनिहाय पुस्तके जमा करून घेतली जाणार आहेत.
बॉक्स
तालुकानिहाय मागवलेली पुस्तके
अमरावती ९९४०, भातकुली ८११८, चांदूर रेल्वे ७८१६, तिवसा ७८४५, अचलपूर २३९२३, चांदूर बाजार १६५१३, दर्यापूर १३९७५, वरूड १७०८३, नांदगाव खंडेश्र्वर ९७०३, अंजनगाव सुजी १३१४६, मोर्शी१४२१४, धामणगाव रेल्वे २५२८५, चिखलदरा १५३३१, धामणगाव रेल्वे ९६६६.