अमरावती : महापालिकेत नव्याने मनुष्यबळ पुरविण्यासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीकडून कार्यरत प्रत्येक कंत्राटी कर्मचाऱ्यांना फोनद्धारे ११,६०० रुपये डिपॉझिट करण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे. तीन दिवसात ही रक्कम जमा न केल्यास रोजगार गमवावा लागेल, अशी धमकी दिली जात आहे. या अफलातून प्रकाराने कंत्राटी कर्मचारी हैराण झाले असून, मंगळवारी आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे तक्रार नोंदविली आहे.
महापालिकेत गत काही वर्षापासून विविध विभागात कंत्राटी पद्धतीने अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहे. हे मनुष्यबळ एजन्सीमार्फत पुरविले जातात. मात्र, यंदा २९५ मनुष्यबळ पुरविण्यासाठी स्थायी समितीने नुकतेच ईटकॉन्स नामक एजन्सीला कंत्राट सोपविला आहे. महापालिकेत अगोदर कंत्राटी पद्धतीेने कार्यरत असलेल्या उच्च शिक्षित, शिक्षित अथवा किमान शिक्षित कर्मचाऱ्यांना त्याच जागेवर रोजगार कायम ठेवायचा असेल तर ११,६०० रुपये डिपॉझिट भरावे लागेल, अशी अट लादण्यात आली आहे. ही रक्कम न भरल्यास नव्याने कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने एजन्सीने जाहिरातदेखील दिली आहे. परिणामी महापालिकेत कार्यरत कंत्राटी कर्मचारी हतबल झाले असून, रोजगार जाणार असल्याच्या भीतीने त्रस्त झाले आहेत.
-----------------
महापालिकेत कार्यरत एकाही कंत्राटी कर्मचाऱ्याला छदमाही देण्याची गरज नाही. यासंदर्भात तक्रार आल्यास योग्य कारवाई केली जाईल. कोणत्याही कंत्राटी कर्मचाऱ्याने रोजगार टिकविण्यासाठी डिपॉझिट रक्कम देऊ नये.
- प्रशांत राेडे, आयुक्त, महापालिका