अमरावती : पावसाची उसंत असल्याने सध्या पिके वाढीवर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांद्वारा रासायनिक खतांची मात्रा दिली जात आहे. अशा परिस्थितीत सर्वाधिक मागणी असलेल्या युरियाचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झालेला आहे. जुलैअखेर १,३८२ मे. टन युरियाचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे वाढीव दरानेही विक्री होत असल्याचे ग्रामीणमधील चित्र आहे.
मान्सून विलंबाने आल्याने यंदा खरिपाच्या पेरण्या २० ते ३० दिवसांनी उशिरा झाल्या, त्यातही ६ जुलैपासून पावसाची रिपरिप सुरू होती. यामध्ये तब्बल ४२ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे काही शेतात तलावसदृश स्थिती निर्माण झाली होती. तेथील पिके पिवळी पडल्याने वाढ खुंटली आहे. अशा परिस्थितीत परिणामकारक युरियाची मागणी वाढली असता ठणठणाट आहे.
याशिवाय खरिपाची पिके आता वाढीवर असताना युरिया देण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झालेली असताना एकमात्र युरिया हे सर्वात स्वस्त म्हणजेच २६६ रुपये प्रतिबॅग मिळणारे खत आहे. त्यामुळे वापर वाढला आहे; परंतु, जिल्ह्यास नियोजित पुरवठा मागील दोन महिन्यात नसल्याने तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे कृषी विभागाने बफर स्टॉक मोकळा केला असला तरी तूट भरून निघालेली नसल्याचे वास्तव आहे.