नांदगाव पेठ : कर लावण्यासाठी गरीब व अशिक्षित अतिक्रमणधारकांना काही लोक २५ हजार रुपयांची मागणी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा कुठल्याही अफवांना किंवा दबावाला बळी न पडता नागरिकांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन केवळ नियमानुसार चलान भरावे, असे आवाहन भाजप तालुका सरचिटणीस राजू चिरडे यांनी केले आहे.
नुकत्याच झालेल्या मासिक सभेत ग्रामपंचायतीने गावातील सर्व अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा ठराव घेतला. असून त्या अनुषंगाने गावातील शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांनी कर लावण्यासंदर्भात अर्जदेखील दाखल केले आहेत. मात्र, कर लावण्यासाठी गरीब व अशिक्षित लाभार्थींना काही लोक २५ हजार रुपयांची मागणी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. लाभार्थ्यांनी कुठल्याही अफवांना किंवा दबावाला बळी न पडता जागेसाठी लागणारा कर व भोगवटदार यासंदर्भात शासन नियमाप्रमाणे जागेच्या आकारानुसार ग्रामपंचायत कार्यालयाकडे चलान भरावे. कुणीही अतिरिक्त व नियमबाह्य पैसे मागितल्यास भाजप कार्यालयाकडे तक्रार करावी. जे लाभार्थी,नागरिक अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत आहे,त्यांना तेथून कोणीही हलवणार नाही किंवा कोणीही त्यांच्यासोबत बळजबरी करू शकणार नाही. शासननिर्णयाप्रमाणे जर त्यांना जागा मिळणार असेल अश्या लाभार्थींना कोणताही अतिरिक्त खर्च नाही, अशी माहिती राजू चिरडे यांनी दिली.