चांदूर बाजार : अनेक वर्षांपासून प्रलंबित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनदरबारी मांडून न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांदूर बाजार येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या विभागीय मेळाव्यात बोलताना दिले.
चांदूर बाजार येथे एका मंगल कार्यालयाच्या सभागृहात ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा विभागीय मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी आमदार राजकुमार पटेल होते. उद्घाटन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. ग्रामपंचायतीच्या सेवकाने कामचुकारपणा केला, तर त्याचा फटका गावातील सर्व नागरिकांना बसतो, याचे भान असावे. मी सामान्य माणसांच्या समस्यांवर लढा देत आलो आहे. १० ऑगस्ट २०२० रोजी कामगार विभागाने काढलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अधिसूचना वित्त विभागाकडून येत्या २६ जानेवारीच्या आत लागू करण्यासाठी प्रयत्न करू तसेच ग्रामपंचायत कर्मचारी महामंडळ स्थापन करून मंत्रिमंडळात प्रतिनिधी नेमण्याच्या कार्यवाहीसाठी करण्यासाठी समिती गठित करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे ना. कडू म्हणाले.
मंचावर पंचायत समिती सभापती वनमाला गणेशकर, उपसभापती नितीन टाकरखेडे, मार्गदर्शक प्रदीप बंड, कर्मचारी संघटनेचे प्रकाश मारोटकर, युनियनचे राज्य अध्यक्ष विलास कुमरवार, कार्याध्यक्ष काजी अल्लाउद्दीन, गिरीश दाभाडकर, आदी उपस्थित होते. माणिकराव पवार, आकाश गुडसुंदरे, गोपाल वानखडे, नीलेश कडू, पांडुरंग लोखंडे यांच्यासह तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले. संचालन पल्लवी चौधरी, प्रास्ताविक मणिक पवार, तर आभार प्रदर्शन अरविंद कुचे यांनी केले. या मेळाव्याला २१ जिल्ह्यांतून ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.