अमरावती : आमदार तथा माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी दान दिलेल्या ३० लाख रुपये किमतीतून स्थानिक हिंदू स्मशानभूमीने खरेदी केलेल्या विद्युत शवदाहिनीला स्थानिकांनी शुक्रवारी कडाडून विरोध केला. शवदाहिनीची तोडफोड करण्यात आली. या शवदाहिनीचे सुटे भाग नजीकच्या नाल्यात फेकण्यात आले. यात भाजप, मनसेचा सक्रीय सहभाग होता, हे विशेष.
हिंदू स्मशानभूमीत कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठी दोन गॅस शवदाहिनी आहेत. पुन्हा नव्याने विद्युत शवदाहिनी लावण्यात येत आहे. परिसरातील नागरिकांकडून ती अन्य स्मशानभूमीत लावण्यात यावी, या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी मूक आंदोलन करण्यात आले. तरीही शुक्रवारी स्मशानभूमी संस्थेने विद्युत शवदाहिनी प्रकल्प मागविला. सकाळी १० वाजता क्रेनद्वारे त्याचे धूड आले. शवदाहिनी लावण्याची तयारी सुरू असताना स्थानिक महिला, पुरुष आक्रमक झाले. क्रेनचालकाला पिटाळूव लावत त्यांनी आणि विद्युत दाहिनीची तोडफोड केली. दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी विद्युत दाहिनीवर निषेधाचे पेंटिंग करून हे यंत्र काही वेळाने उलटविले. दाहिनीचे सूट भाग महिलांनी बाहेर काढले आणि नासधूस केली. काही सुटे भाग नजीकच्या नाल्यात फेकण्यात आले.
आंदोलनात भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, नगरसेवक प्रणीत सोनी, मनसेचे संघटक पप्पू पाटील, शहराध्यक्ष संतोष बद्रे, नगरसेविका स्वाती कुळकर्णी, विशाल कुळकर्णी, अजय सारसकर, नितेश शर्मा, हर्षल ठाकरे, संगीता मडावी, प्रीती साहू, सोनल भुतडा, सचिन गावनेर, सुनीता तिवारी, रूपाली वारे, कीर्ती कोठार, प्रिया क्षीरसागर, पूजा कोंडे आदींचा सहभाग होता.
००००००००००००००००००००००
कोट
विद्युत शवदाहिनी हा प्रकल्प पर्यावरणपूरक आहे. अगोदर दोन गॅस दाहिनी असून, विद्युत दाहिनीचा तूर्त वापर होणार नव्हता. ती केवळ स्थापित करण्यात येणार होती. गॅस दाहिनीत बिघाड आल्यास ती पर्यायी व्यवस्था असेल.
- आर. बी. अटल, अध्यक्ष, हिंदू स्मशानभूमी संस्था
--------------
राजापेठ ठाण्यात ४० जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले
हिंदू स्मशानभूमीत विद्युत शवदाहिनीला विरोध करण्यासाठी एकत्र येणे आणि प्रकल्पाची तोडफोड करणे, मालमत्ताचे नुकसान अशा विविध मुद्द्यांवर राजापेठ पोलिसांनी तब्बल ४० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी ‘लोकमत’ला दिली. आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याने भादंविच्या कलम १८८, ३४१, १४३, १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.