अमरावती : जिल्ह्यातील महिला बालविकास विभागामार्फत ग्रामीण भागात कार्यरत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यानचे मानधन रखडल्याने बुधवारी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करीत प्रशासनाचे लक्ष वेधले.महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) च्या नेतृत्वात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांचे मानधन शासनस्तरावरुन पाठपुरावा केल्यानंतरही अदा करण्यात आले नाही. परिणामी अंगणवाडी सेविकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. मानधनाशिवाय गॅस सिलिंडरचे पैसे, प्रवास देयके इंधन बिल अशा सर्वच महत्त्वाच्या बाबी निधीअभावी रखडून पडल्या आहेत. त्यामुळे शासनाने प्रलंबित मानधन व अंगणवाडीचा निधी त्वरित उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आंदोलनकांनी केली आहे. दरम्यान शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांना निवेदन सोपविण्यात आले.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी.के. जाधव, अरुणा देशमुख, मीरा कैथवास, सुमित्रा हिवराळे, रत्नमाला ब्राह्मणे, प्रमिला राव, चंदा गायकवाड, आरीफ जहाँ, माधुरी देशमुख, शालू सोनोने, चंदा गायकवाड, मीना वऱ्हाडे, रेखा नवरंगे, कीर्ती ओगलेकर, सुभद्रा भोयर, रंजना धोटे, रंजना कडू, शीला सातपुते, रमा प्रभे, आशा टेहारे, प्रमिला भांबूरकर आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
अंगणवाडी सेविकांचे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने
By admin | Published: January 28, 2015 11:08 PM