लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वातावरणात सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर होत आहे. सध्या या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयात गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहेत. त्यात डासांची पैदास वाढल्याने डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसले.सध्या वातावरणात सतत बदल होत आहे. गत काही दिवसांपासून दिवसा तीव्र उन्ह, ढगाळ वातावरण तर पहाटे थोड्या प्रमाणात थंडी जाणवत आहे. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन वाढील लागले आहे.जुलै महिन्यात पावसाने कहर केला होता. त्यानंतर वातावरण बदलले पावसाने उघडीप दिली. दुपारी कडक उन पडल्यामुळे हवेत उष्णता निर्माण झाली. सध्या हे वातावरण पुन्हा बदलेले असून ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळात वातावरणामध्ये उष्णता आणि कधीकधी गारठा जाणवत आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढत असल्याची स्थिती आहे .सध्या अनेकांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यासारखे संसर्गजन्य आजारांनी ग्रासले आहे. वातावरणातील संसर्गामुळे रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून रुग्णालय गर्दीने फुलली आहेत. किरकोळ दिसणार हे आजार बळावू नयेत म्हणून रुग्ण तातडीने उपचार घेत आहेत. बदलत्या वातावरणात डासांची पैदास वाढली असून डेंग्यू व अन्य आजाराला निमंत्रण मिळत आहे. आजघडीला जिल्ह्यात डेंग्यू,चिकणगुनिया,मलेरियाचे रूग्ण आढळून येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सुत्रांनी सांगितले.
सल्ल्याशिवाय औषधे नको!सर्दी, ताप ,खोकला, अंगदुखी हे ग्रामीण भागात सर्रास होणारे आजार आहे .त्यामुळे या आजाराकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. अनेक वेळा अशा आजारांसाठी मेडीकल्स करून गोळ्या आणून त्याचे सेवन केले जाते.मात्र परस्पर गोळ्या घेणे हे दुसऱ्या आजाराला किंवा असलेले आजार बळावण्याची कारणीभूत ठरू शकते.
अशी घेता येईल घरगुती दक्षता- पाणी साठवण टाक्या नियमित स्वच्छ कराव्यात.- घराच्या आसपास पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी- झुडपे व नाशक गवत काढून घ्यावे- घरात स्वच्छता ठेवावी कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावावी.- आजारी व्यक्तीच्या संपर्कात जाणे टाळावे.
घरातील साठवलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा ड्राय डे पाळावा. डेंग्यू व अन्य आजाराचे रूग्ण आढळून येत असल्याने आजाराची कुठलेही लक्षण दिसून आल्यास डॉक्टरराचा सल्ला घेवून उपचार घ्यावेत.डॉ. रेवती साबळे, जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी