अमरावती : जिल्ह्यात कीटकजन्य आजारांनी डोके वर काढले असून, ऑगस्टमध्ये ६२ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक ५४ रुग्ण हे महापालिका क्षेत्रातील असून, ८ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. सध्या जिल्ह्यातील दमट वातावरण हे कीटकजन्य आजार वाढीला पोषक असल्याने रुग्णांची संख्या वाढल्याचे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु, प्रत्यक्षात महापालिका क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजनांचाही अभाव असल्याचे पाहायला मिळत आहे.
पावसाळ्यात जागोजागी पाण्याचे डबके साचतात, त्यामुळे या दिवसांमध्ये प्रामुख्याने कीटकजन्य आजारांचे प्रमाणही वाढत असते. परंतु, सध्या जिल्ह्यात पाऊस नसतानाही डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. जुलै महिन्यात झालेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतर पावसाच्या खंडामुळे वातावरणामध्ये झालेला बदल हा कीटकजन्य आजार वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याचे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे यासारख्या लक्षणांवर दुर्लक्ष न करता तातडीने रुग्णालयात जाऊन रक्ताची चाचणी करण्याची गरज आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात २२५ संशयित रुग्णांचे रक्त नमुने तपासले असता, त्यातील ६२ नमुने हे डेंग्यू पॉझिटिव्ह तर चिकनगुनियाचे ३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर मलेरियाचेही ४ रुग्ण आढळून आले आहेत.
आठ महिन्यांत डेंग्यू ९९ तर मलेरिया २४
जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांतील आकडेवारीनुसार ३८७ संशयित रुग्णांची तपासणी केली असता, यामध्ये डेंग्यूचे ९९ तर चिकनगुनियाचे १६ रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ७ हजार ६७ रुग्णांच्या रक्तचाचणीत २४ मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत.
महापालिका क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण
महापालिका क्षेत्रात दाट वस्ती असल्याने ग्रामीण क्षेत्रापेक्षा जास्त रुग्ण असल्याचे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे. ऑगस्ट या एका महिन्यामध्येच महापालिका क्षेत्रात ५४ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. तर जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत ८० रुग्ण आढळून आले आहेत.
नागरिकांनी अशी घ्यावी काळजी
कीटकजन्य आजारापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी एक दिवस कोरडा पाळावा. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. डास चावणार नाही, अशा साधनांचा वापर करावा. डास उत्पत्ती स्थाने नष्ट करावीत. ताप आल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन तपासणी करावी.
कीटकजन्य आजार रोखण्यासाठी महापालिका आरोग्य प्रशासनाकडून सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण आणि जनजागृतीही करण्यात येत आहे. नागरिकांना आवाहन आहे, जर घरात कोणीही आजारी असेल तर महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये डेंग्यूची नि:शुल्क चाचणी करावी.
देवीदास पवार, प्रभारी आयुक्त, मनपा
अशी आहे आकडेवारी
महिना - डेंग्यू पॉझिटिव्ह
- जानेवारी - ०२
- फेब्रुवारी - ०६
- मार्च - ००
- एप्रिल - ०१
- मे - ००
- जून - ११
- जुलै - १९
- ऑगस्ट - ६२
एकूण - ९९