अनिल कडू
परतवाडा : अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील अचलपूर व परतवाडा या जुळ्या शहरात डेंग्यूचे २० दिवसांपासून तांडव सुरू आहे. ग्रामीण भागातही डेंगू रुग्णांची संख्या वाढतीच आहे. खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये दररोज दोनअंकी संख्येत डेंग्यू पॉझिटिव्ह निघत आहेत.
डेंग्यू रुग्णांसोबतच व्हायरलनेही डोके वर काढल्यामुळे अख्खा तालुका तापाने फणफणत आहे. शहरातील सर्व दवाखाने रुग्णांनी खच्चून भरले आहेत. महिनाभरापासून अचलपूर परतवाडा या जुळ्या नगरीत निघालेल्या डेंग्यू रुग्णांची संख्या अडीचशेच्या वर आहे. ग्रामीण भागात हीच संख्या दीडशेवर पोहोचली आहे. खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये दररोज तपासल्या गेलेल्या दहा डेंग्यू संशयित रुग्णांमध्ये सात रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघत आहेत.
दिवसेंदिवस डेंग्यूचे रुग्ण वाढतच आहेत. पण याकडे संबंधित प्रशासकीय यंत्रणेला लक्ष देण्यास वेळच नाही. दरम्यान अचलपूर नगरपालिका क्षेत्रात नगरपालिका प्रशासनाकडून व ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामपंचायतीकडून केल्या जात असलेल्या उपाय योजना आणि वापरल्या जाणारी साधने, यंत्रणा तोकडी पडत आहे. नाल्या आणि गटारे तुडूंब भरली आहेत. रस्त्यांवर पाण्याची डबकी साचली आहेत. काही भागातील पाणी हिरवे पडले आहे. त्या डबक्यातील पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. गप्पी माशांचा नावापुरता गवगवा केला जात आहे. डासांचा उद्रेक सर्वत्र बघायला मिळत आहे. कुठल्याही भागात परिणामकारक फवारणी नाही.
शहरी भागासह ग्रामीण भागात डेंग्यूचे तांडव सुरू असतानाही शासकीय यंत्रणेकडून प्रयोगशाळेकडे पाठविल्या गेलेल्या शेकडो रक्तजल नमुन्यांचे अहवाल अजूनही प्रतीक्षेत आहेत. खासगी प्रयोगशाळेतील अहवालावर खासगी रुग्णालयासह सरकारी रुग्णालयात डेंग्यूचा उपचार घेऊन डेंग्यू रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. रुग्ण बरे होऊन बराच कालावधी लोटूनही शासकीय प्रयोगशाळेकडे अहवाल अजूनही अहवाल आलेले नाहीत.
-- डेंग्यू रुग्णात बदल--
डेंग्यू रुग्णांमध्ये प्लेटलेटची संख्या कमी असते. पण अलीकडे डेंग्यू रुग्ण पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांपैकी काही रुग्णांमध्ये प्लेट लेट नॉर्मल आढळून आल्या आहेत. हा बदल खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये बघायला मिळाला.
कोट:
महिनाभरापासून डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. डेंग्यूच्या अनुषंगाने केलेल्या दहा डेंग्यू टेस्टमध्ये सात रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत. डेंग्यू रुग्णांमध्ये प्लेटलेटची संख्या कमी होते. पण अलीकडे काही रुग्णांमध्ये प्लेटलेटची संख्या नॉर्मल आढळून आली आहे.
- डॉ. ओमप्रकाश बोहरा, एमडी पॅथॉलॉजी