अमरावती : महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे डेंग्यू, चिकनगुनिया व हिवतापाचे रुग्ण वाढले आहे. शहरात जुलै व ऑगस्ट महिन्यात १,७१४ संशयित नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये तब्बल ११४ नमुने डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अद्याप सप्टेंबर महिन्याचा अहवाल अप्राप्त असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
पावसाळ्यात डासजन्य आजारात मोठ्या प्रमाणात वाढ होते. महापालिका क्षेत्रात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असतानाच खुज्या भूखंडात मोठ्या प्रमाणात डबकी साचत आहे व या ठिकाणी डासांची उत्पत्ती होत आहे. महापालिकेद्वारा या ठिकाणी आवश्यक एमएलओ आईल टाकण्यात येत नाही. धुवारणी, फवारणी अभावानेच होत असल्याने आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे व मृतांची संख्या आरोग्य विभाग लपवित असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
महापालिकेची प्रत्येक विभागात क्षेत्रीय यंत्रणा असतांना केवळ बेपर्वा धोरणामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालला आहे. नियमितपणे नाल्या सफाई होत नाही, रोज कचऱ्याची उचल होत नाही. प्रशासनच कंत्राटदारांचे बटीक झाल्यासारखी स्थिती असल्याने आजारात दिवसेंदीवस वाढ होत आहे. डेंग्यूसोबतच हिवताप व चिकनगुनिया आजारानेही डोके वर काढले आहे. सध्या शासकीय व खासगी दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहे.
बॉक्स
जुलैमध्ये ४०, ऑगस्टमध्ये ७४ डेंग्यू पॉझिटिव्ह
आरोग्य विभागाचे माहितीनुसार जुलै महिन्यात २०० संशयितांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यामध्ये ४० तर ऑगस्टमध्ये १,४१४ नमुने तपासणीला पाठविण्यात आले. यामध्ये ७४ डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आलेत. याशिवाय सप्टेंबर महिन्यात ८५१ संशयित नमुने तपासणीला पाठविण्यात आले. याचा अहवाल अप्राप्त असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
बॉक्स
जिल्ह्यात डेंग्यूचे ३१२ पाॅझिटिव्ह
आरोग्य विभागाचे माहितीनुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत डेंग्यू ३१२, चिकनगुनिया ४१ व हिवतापाच्या १७ रुग्णांची नोंद झालेली आहे. यामध्ये ११ संशयित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. यापैकी ११४ अमरावती महापालिका क्षेत्रातील आहे. याशिवाय तिवसा व अचलपूर तालुका डेंग्यूचा हॉटस्पॉट बनला आहे. सततचा पाऊस व वातावरणातील बदलाने जिल्हा तापाने फणफणला आहे.