अधिकाऱ्यांची कसरत : शिक्षण संचालकांनी माहिती मागवलीअमरावती : शासनाच्या बहुतांश शासकीय कार्यालयांचा कारभार पेपरलेस झाला आहे. त्यामुळे शिक्षण संचालकांनीदेखील यादृष्टीने पावले उचलली आहेत. तालुका आणि जिल्हा पातळीवर माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.शासनाने प्रत्येक विभागाचा कारभार पेपरलेस करण्याचा निर्णय घेतला असून बहुतांश शासकीय कार्यालयांतील कारभार पेपरलेस झाला आहे. मात्र शाळेच्या पटसंख्येसह इतर अनेक प्रकारची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागापर्यंत पोहोचविण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा रजिस्टर व अन्य कागदपत्रांचा लवाजमा घेऊन जावे लागते. यामुळे कामात विलंब होत असल्याने शिक्षण विभानेही इतर शासकीय कार्यालयांतील कार्यप्रणालीप्रमाणे शिक्षण विभागाचाही कारभार पेपरलेस करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. माहितीचे कागदपत्रे हस्तांतरणाचा टप्पा टाळणार असून एका क्लिकवर संपूर्ण माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचविणे या प्रणालीमुळे आता शक्य होणार आहे. त्या अनुषंगाने तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील कार्यालय आॅनलाईन करण्यासाठी प्रत्येक विभाग संगणकीकृत करण्यावर सध्या भर दिला जात आहे. पेपरलेस वर्क ही संकल्पना शासकीय पातळीवर रुजविली जात आहे. यामध्ये शिक्षण विभागही इंटरनेटशी जोडला जाणार आहे. यासाठी शिक्षण संचालक महावीर माने यांनी यासंदर्भात माहिती मागविली आहे.प्राथमिक शिक्षणाधिकारी सर्व अधीक्षक, वेतन व भविष्यनिर्वाह निधी, पथक कार्यालये सर्व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शालेय पोषण आहार कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्वतंत्र संगणक व इंटरनेटवर सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. त्यामुळे कामे वेळेत होण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)
शिक्षण विभागाचा कारभार होणार पेपरलेस
By admin | Published: November 04, 2015 12:13 AM