अमरावती : शेततळे लक्ष्यांकाची पूर्ती न केल्यामुळे दर्यापूर तालुक्यातील सहा कृषी सहायकांना शिक्षा म्हणून ऑगस्टमध्ये बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर व धामणगाव तालुक्यात प्रतिनियुक्तीवर पाठविले आहे. एक महिन्यासाठी प्रतिनियुक्ती असल्याचे विभागीय कृषी सहसंचालकांनी सांगितले. प्रत्यक्षात मूळ मुख्यालयास परत आणण्यास टाळाटाळ केली जात असल्याने, कृषी सहायक संघटना आक्रमक झाली आहे.
दर्यापूर तालुक्यात वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लक्ष्यांक पूर्ण न केल्यामुळे सहा कृषी सहायकांना बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे व येथेही कृषी अधिकाऱ्यांद्वारा मानसिक त्रास दिल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत विभागीय कृषी सहसंचालक यांच्याशी संघटनेद्वारा सातत्याने पाठपुरावा सुरू असताना सहकार्य होत नसल्याचा संघटनेचा आरोप आहे.
वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी वरिष्ठ अधिकारी कृषी सहायकांवर सातत्याने दबाब आणत आहेत. त्यामुळेच दर्यापूर तालुक्यातील सहा कृषी सहायकांवर कारवाई करण्यात आल्याचा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र मोहोड यांनूी केला आहे. याचे निषेधार्त २५ ऑक्टोबरपासून जिल्हाभरात कृषी सहाय्यकांचे आंदोलन होणार असल्याचे ते म्हणाले