अमरावती : विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता यांनी प्रशासनाची बाजू मांडताना श्रीक्षेत्र मोझरी, कौंडण्यपूर व वलगाव या तीनही तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी शासनाकडून तरतूद प्राप्त झाली. या तीर्थक्षेत्रांचा पर्यटन वाढीच्या दृष्टीने पिण्याचे पाणी, शौचालय, पर्यटकांचे आवागमनाची सोय, भक्तांसाठी बैठक व्यवस्था, विद्युत व्यवस्था, लहान मुलांसाठी बगीचा, पोलीस चौकी, रुग्णालय यासारख्या मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात. नियोजन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रकल्प कार्यकारीणी समिती आदींनी इमारत बांधकाम, सांडपाणी व्यवस्थापन व इतर स्थापत्य कामे नियोजनबद्ध पद्धतीने निर्माण करावी, असे गुप्ता म्हणाले. शासनाकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्रीक्षेत्र मोझरी विकास आराखड्यासाठी आर्थिक वर्ष २०१७ एकूण तरतूद १५० कोटी ८३ लक्ष रुपये आहे. यापैकी १३९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सुमारे १४३ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तीर्थस्थळाच्या परिसरातील कामे करण्यासाठी कार्यान्वीत यंत्रणाना ११४ कोटी रुपये वितरीत केले असून ईतका प्रत्यक्ष खर्च झाला आहे. मोझरी विकास आराखडयामध्ये मोझरी शहरातील नऊ विकास कामे, मोझरी, शेंदोळा खुर्द, वरखेड, शिराळा, यावली (शहीद) आदी गावातील विकास कामे तसेच राष्ट्रगंत तुकडोजी महाराजाचे विचार, शिकवण, मूल्य आणि दृष्टी यांचा प्रसार करणे या कामांचा अंतर्भाव आहे. अशी माहिती नियोजन विभागाव्दारे बैठकीत देण्यात आली. तिवसा तालुक्यातील विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान श्रीक्षेत्र कौंडण्यपूर परिसरात पायाभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी २० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. सन २०१६-१७ पर्यंत १७ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. सुमारे १४ कोटी रुपये संबंधित यंत्रणांना वितरीत करण्यात आला असून कार्यान्वयीन यंत्रणेव्दारे १३ कोटी खर्च झालेला आहे. जिल्ह्यातील वलगाव येथील संत गाडगेबाबांची निर्वाणभूमी विकसित करून मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी ३७ कोटीच्या विकास आराखड्यातील एकूण ३२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कार्यान्वयीन यंत्रणेला आतापर्यंत २५ कोटी वितरीत करण्यात आले असून त्यापैकी १८ कोटी खर्च झालेला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईने या तिन्ही विकास आराखड्यातील कामे रखडत आहे. त्यामुळे आ. यशोमती ठाकूर संतप्त झाल्या. बैठकीत त्यांनी आराखड्यासंबंधी यंत्रणेला खडेबोल सुनावले. विभागीय आयुक्तांनी हा मुद्दा गंभीरतेने घेत कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले. (प्रतिनिधी)
विभागीय आयुक्तांनी सावरली बाजू
By admin | Published: April 22, 2017 12:22 AM