फोटो - धारणी १५ आर
नागरिकांची मागणी, सर्व्हे नंबर १३२ मधील जागा पडून, गरीब अतिक्रमणधारकांना पट्टे केव्हा मिळणार?
श्यामकांत पाण्डेय
धारणी : शहराला लागून असलेल्या पूर्वेकडील मौजा तलाई येथील सर्व्हे नंबर १३२ मध्ये अनेक गर्भश्रीमंतांनी शासनाकडून काही अटी व शर्तींवर रहिवासी प्रयोजनासाठी जागा घेतली होती. त्याला जवळपास ४० वर्षे होत आले असून, अनेक जागा रिकाम्या आहेत. त्यावर बांधकाम करून राहण्याची तरतूद करण्यात आली नसल्यामुळे अनावश्यक लोकांना वाटण्यात आलेले शासकीय जमीन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रकरण सुरू करून या जागा सरकारजमा कराव्या, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सर्व्हे नंबर १३२ या शासकीय जागेत गोरगरिबांना अत्यल्प दरात राहण्यासाठी शासनाने ६४ भूखंडांची निर्मिती करून ले-आउट पाडले होते. यापैकी अनेक जागा रिकाम्या आहेत. शासकीय नियमाप्रमाणे रहिवासी प्रयोजनासाठी जागा देताना एक वर्षाच्या आत बांधकाम करणे आवश्यक असते. यामुळे आजपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यात न आलेल्या जागांबाबत शासनाकडून कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. आजमितीस धारणी शहरात अनेक गोरगरीब असे आहेत, ज्यांच्याकडे राहण्यासाठी जागा नाही. त्यामुळे रिकाम्या शासकीय जागा आवंटित केलेल्या लोकांकडून परत घेऊन गरजू लोकांना देण्याची प्रक्रिया राबवणे आवश्यक झाले आहे.
-----------
शासकीय भूखंड रिकामे
सर्व्हे नंबर १३२ मध्ये अमरावती-बर्हाणपूर मुख्य मार्गाला लागून उत्तरेकडे अनेक शासकीय भूखंड रिकामे आहेत. या जागांची किंमत धारणी शहरातील वाढत्या मागणीप्रमाणे कोट्यवधींच्या घरात आहे.
-------
ग्रामपंचायतीकडून कार्यवाहीची प्रतीक्षा
सर्व्हे नंबर १३२ मधील दूरभाष केंद्र कार्यालयाच्या पाठीमागे आणि हरिहरनगरला लागून असलेल्या शासकीय जागेवर अनेक गरिबांनी अतिक्रमण केले. अशा अतिक्रमणधारकांना शासकीय नियमानुसार कारवाई करून मालकी पट्टे देण्याची आवश्यकता आहे. याकरिता दिया ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांकडून अपेक्षित कार्यवाहीची प्रतीक्षा आहे.