पान १
अमरावती : बार रेस्टारंटवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ४० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. त्या लाचखोरासोबत वडाळीच्या एका खासगी इसमालादेखील ‘ट्रॅप’ करण्यात आले. येथील रेल्वे स्टेशन ते बस डेपो रोडवरील मलकापूर अर्बन बँकेसमोर ही कारवाई करण्यात आली. दुय्यम निरीक्षक संजय केवट (४६) व प्रशांत सांगोले, रा. देवीनगर, वडाळी), अशी एसीबीने ताब्यात घेतलेल्या लाचखोरांची नावे आहेत. एसीबीनुसार, तक्रारदार हे त्यांच्या वडिलांच्या नावे परवाना असलेले बार रेस्टॉरंट चालवितात. केवट व प्रशांत सांगोले या दोघांनी तक्रारदाराला त्यांच्या रेस्टॉरंटमधील स्टॉक रजिस्टर व गोडाऊनमध्ये ठेवलेल्या मालामध्ये तफावत असल्याचे दाखवून कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्याकरिता ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती दुय्यम निरीक्षक संजय केवट याच्या सांगण्यावरून सांगोले याने तक्रारदाराकडून ४० हजार रुपये लाच स्वीकारली. त्याला घटनास्थळाहून रंगेहाथ पकडण्यात आले, तर दुय्यम निरीक्षकास अचलपुरातून अटक करण्यात आली.
--------------------------यांनी केली कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक
अरुण सावंत, उपअधीक्षक संजय महाजन व एस. एस. भगत यांच्या नेतृत्वात पीआय संतोष इंगळे व सतीश उमरे, कर्मचारी सुनील वऱ्हाडे, युवराज राठोड, महेंद्र साखरे, अभय वाघ, तुषार देशमुख, नीलेश महिंगे, वाहन चालक सतीश किटुकले, चंद्रकांत जनबंधू, उपेंद्र थोरात यांनी केली.